हिंदू सेनेने बसवलेल्या नथुराम गोडसेच्या पुतळ्याची जामनगर काँग्रेसचे अध्यक्ष दिगुभा जडेजा आणि त्यांच्या साथीदारांनी मंगळवारी तोडफोड केली.मंगळवारी सकाळी काँग्रेस नेते पुतळ्याच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी पुतळा पाडला. कार्यकर्त्यांनी नथुराम गोडसेच्या पुतळ्याभोवती भगवं कापड लावून तो तोडला.

हिंदू सेनेने ऑगस्टमध्ये जामनगरमध्ये नथुराम गोडसेचा पुतळा बसवण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, स्थानिक अधिकाऱ्यांनी जागा देण्यास नकार दिल्यानंतर संस्थेने ‘नथुराम गोडसे अमर रहे’चा नारा देत हनुमान आश्रमात तो उभारला. मंगळवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुतळ्याची तोडफोड केली.

दरम्यान, हिंदू महासभेने हरियाणाच्या अंबाला सेंट्रल जेलमधून आणलेल्या मातीने नथुराम गोडसेचा पुतळा बनवणार असल्याचे म्हटले आहे, जिथे त्याला १९४९ मध्ये फाशी देण्यात आली होती. उजव्या विचारसरणीच्या संघटनेने सोमवारी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

“महासभेच्या कार्यकर्त्यांनी गेल्या आठवड्यात अंबाला जेलमधून माती आणली, जिथे गोडसे आणि नारायण आपटे यांना फाशी देण्यात आली होती. या मातीचा वापर गोडसे आणि आपटे यांचे पुतळे बनवण्यासाठी केला जाईल आणि ते ग्वाल्हेर येथील महासभेच्या कार्यालयात बसवले जातील,” हिंदू महासभा राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ जयवीर भारद्वाज यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.