आजच्याच दिवशी २० वर्षांपूर्वी म्हणजेच १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल युद्धात विजय मिळवला. त्याच निमित्ताने १९९९ च्या कारगिल युद्धात नक्की काय घडले यावर लोकसत्ता ऑनलाइनने टाकलेली नजर… > भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात मे, जून आणि जुलै असे तीन महिने युद्ध सुरु होते. > कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोकण्यासाठी आणि त्यांनी काबीज केलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारताने ऑप्रेशन विजयची सुरुवात केली. > टिव्हीवरून देशाने पाहिलेले कारगिल युद्ध हे पहिलेच युद्ध ठरले. १९९९च्या कारगिल युद्धाचा घटनाक्रम…. > मे ४: कारगिलमधील उंच ठिकाणांवर पाकिस्तानी सैन्याने ताबा मिळवल्याची बातमी हाती आली. > मे ५ ते मे १५: या दहा दिवसांमध्ये भारतीय लष्कराच्या तुकड्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्वेक्षण केले. यामध्ये कॅप्टन सौरभ कालिया बेपत्ता झाले. त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेऊन छळ करुन ठार केल्याचे बोलले जाते. > मे २६: भारतीय हवाई दलाने कारगिलमधील पाकिस्तानी सैन्याच्या छावण्यांवर हवाई हल्ले सुरु केले. श्रीनगर, अवंतीपूर आणि आदमपूर एअरबेसवरून मीग २१, मीग २३, मीग २७, जॅग्वार, मीरेज २००० या लडाकू विमानांनी पाकिस्तानी तळांवर बॉम्ब हल्ले केले. > मे २७: भारतीय हवाई दलाचे मीग २७ विमानाला अपघात होऊन ते कारगिलमध्ये पडले. विमान कोसळण्याआधी पॅरेशूटच्या सहाय्याने विमानाबाहेर आलेल्या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने युद्ध कैदी म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर आठ दिवसांनी या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने भारताच्या ताब्यात दिले. > मे ३१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगिलमध्ये ‘युद्धसदृश्य परिस्थिती’ असल्याची माहिती दिली. > जून १०: पाकिस्तानने छिन्नविछिन्न अवस्थेतील विटंबना केलेल्या सहा भारतीय जवानांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. हे मृतदेह कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या टीममधील सैनिकांचे होते. ही टीम पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केल्याचे वृत्त हाती आल्यानंतर सर्वेक्षणासाठी गेली होती. > जून १२: दिल्लीमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक निष्फळ ठरली. भारताचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग आणि पाकिस्तानचे परराष्ट मंत्री सरताज अजीज यांची भेट दिल्लीत झाली. मात्र चर्चेनंतर पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेत भारतालाच घुसखोरांनी परत जायला हवे असे सांगितले. > जून १५: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना कारगिलमधून सैन्य मागे घेण्याची विनंती केली > जून २९: भारतीय लष्कराने टायगर हिल्स प्रदेशातील दोन महत्वाच्या चौक्या ताब्यात घेतल्या. > जुलै ४: संपूर्ण टायगर हिल्स प्रदेशावर भारतीय लष्कराने ताबा मिळवला. भारतीय लष्कराच्या तीन तुकड्यांनी १८ ग्रेनेडियर्स, २ नागा आणि ८ शिख बटालियनने या प्रदेशात जोरदार गोळीबार करुन हा प्रदेश ताब्यात घेतला. अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची भेट घेतली > जुलै ५: शरीफ यांनी पाकिस्तान कारगिलमधून सैन्य मागे घेत असल्याची घोषणा केली > जुलै ११: पाकिस्तानने कारगिलमधून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली > जुलै १४: भारताने ऑप्रेशन विजय यशस्वी झाल्याची घोषणा केला > जुलै २६: कारगिल युद्धाच्या संपल्याची औपचारिक घोषणा केली. मृतांची आकडेवारी > या युद्धामध्ये ५२७ भारतीयांना प्राण गमवावे लागले तर पाकिस्तानमधील मृतांचा आकडा ४५० इतका होता कारगिल युद्धामधील शौर्यासाठी प्रदान करण्यात आलेले पुरस्कार > घुसखोरी झाल्यानंतर जवळजवळ तीन महिने सुरु असलेल्या या युद्धानंतर अनेक लष्करी अधिकाऱ्यांना त्यांच्या शौर्यासाठी सन्मानित करण्यात आले > भारतीय सुरक्षादलातील एकूण ९७ जणांना कारगिल युद्धातील कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले. > १८ ग्रेनेडीयर बाटलियनचे सैनिक ग्रेनेडीयर (हातबॉम्ब फेकणारा सैनिक) योगेंद्र सिंग यादव यांना परमवीर चक्र पुरस्कार > १/११ गोरखा रायफल्स बाटलियनमधील लेफ्टनंट मनोज कुमार पांड्ये यांना परमवीर चक्र पुरस्कार (मरणोत्तर) > १३ जेएके रायफल्स बाटलियनचे कॅप्टन विक्रम बत्रा यांना परमवीर चक्र पुरस्कार (मरणोत्तर) > १३ जेएके रायफल्सचे रायफलमॅन संजय कुमार यांना परमवीर चक्र पुरस्कार > १७ जाट बाटालियनचे कॅप्टन अर्जून नायर यांना महावीर चक्र पुरस्कार (मरणोत्तर) > १८ ग्रेनेडीयर बाटलियनचे मेजर राजेश सिंग अधिकारी यांना महावीर चक्र पुरस्कार (मरणोत्तर) > ११ राजपुताना रायफल्सचे कॅप्टन हनिफउद्दीन यांना वीर चक्र पुरस्कार (मरणोत्तर) > १ बिहार बटालियनचे मेजर मरिय्यपन सर्वनन यांना वीर चक्र पुरस्कार (मरणोत्तर) > भारतीय हवाईदलाचे स्क्वाड्रन लीडर अजय अहूजा यांना वीर चक्र पुरस्कार (मरणोत्तर) > ८ जेएके एलआय हवालदार चुन्नी लाल यांना वीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच शौर्यासाठी सेना मेडलही देण्यात आले. त्यानंतर नायाब सुबेदार झाल्यानंतर निवृत्त झालेल्या चुन्नी लाल यांना मरणोत्तर अशोक चक्र पुरस्कार जाहीर करण्यात आला.