देशात महिलांची संख्या पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा अधिक

१ हजार पुरुषांच्या तुलनेत १०२१ महिला; महिला सक्षमीकरणाच्या उपाययोजनांचा परिणाम

१ हजार पुरुषांच्या तुलनेत १०२१ महिला; महिला सक्षमीकरणाच्या उपाययोजनांचा परिणाम

नवी दिल्ली : भारतातील महिलांची संख्या पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा अधिक झाली असून हे प्रमाण १ हजार पुरुषांच्या तुलनेत १०२१ महिला असे झाले असल्याचे राष्ट्रीय कुटुंब व आरोग्य सर्वेक्षण- ५ (एनएफएचएस-५)मध्ये आढळून आले आहे. देशाच्या लोकसंख्याशास्त्रात झालेला बदल यातून प्रतिबिंबित झाला आहे.

‘हे लक्षात घेता, लिंग गुणोत्तर (सेक्स रेशो) १ हजारांपलीकडे गेल्यामुळे भारत आता विकसित देशांच्या रांगेत आला असल्याचे आपण म्हणू शकतो’ असे आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. आर्थिक बाबतीत महिलांचा सहभाग, तसेच लैंगिक भेदभाव आणि विषमता यांच्याशी लढा यांसारख्या महिला सक्षमीकरणाच्या उपाययोजनांना याचे श्रेय असल्याचे ते म्हणाले.

जन्माच्या वेळचे लिंग गुणोत्तर २०१२-१६ सालच्या ९१९ वरून २०१९-२० साली ९२९ पर्यंत वाढले आहे. यातून गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याच्या (पीसी अँड पीएनडीटी अ‍ॅक्ट) अंमलबजावणीसारख्या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

२००५-०६ साली झालेल्या एनएफएचएस-३ सर्वेक्षणानुसार, लिंग गुणोत्तर १०००:१००० असे होते आणि २०१५-१६ साली (एनएफएचएस-४) ते ९९१:१००० इतके घसरले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २४ नोव्हेंबरला एनएफएचएस-५ चे भारतासाठीचे, तसेच दुसऱ्या टप्प्यातील १४ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसाठीचे निष्कर्ष जाहीर केले. लोकसंख्या, पुनरुत्पादक व बालक आरोग्य, कुटुंब कल्याम, पोषाहार व आरोग्याशी संबंधित इतर मुद्यांवरील प्रमुख निर्देशांकांच्या तक्त्यांच्या स्वरूपात हे निष्कर्ष जाहीर करण्यात आले.

लोकसंख्येच्या विस्फोटाची दंतकथा मोडीत

एकूण प्रजनन क्षमता दर (टोटल फर्टिलिटी रेट) २.२ वरून २.० इतका घसरला असल्याच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या(एनएचएफएस-५) अहवालामुळे लोकसंख्येच्या विस्फोटाची दंतकथा मोडीत निघाली असून, भारताने लोकसंख्या नियंत्रणाच्या बळजबरीच्या उपाययोजनांपासून फारकत घ्यायला हवी, असे पॉप्युलेशन फाऊंडेशन ऑफ इंडियाने (पीएफआय) गुरुवारी सांगितले. टीएफआरमधील घट- दर महिलेमागे मुलांची सरासरी संख्या- हे असाधारण काम आहे, असे पीएफआयच्या कार्यकारी संचालक पूनम मूत्तरेजा यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एनएफएचएसच्या पाचव्या फेरीतील अहवालाचा संपूर्ण संच बुधवारी जारी केला. आरोग्य आणि कुटुंबकल्याणविषयक मुद्दय़ांची ही सर्वसमावेशक आकडेवारी मानली जाते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: National family and health survey more women than men in india for the 1st time zws

ताज्या बातम्या