देशातील महिलांबाबत खूप चांगली बातमी आली आहे. देशात प्रथमच पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या वाढली आहे. आता प्रत्येक १००० पुरुषांमागे १,०२० स्त्रिया आहेत. त्याचबरोबर हा विक्रमही स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झाला आहे ज्यात पुरुषांच्या तुलनेत महिलांची लोकसंख्या १००० च्या वर गेली आहे. आणखी एक चांगली बातमी म्हणजे जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर देखील सुधारले आहे. २०१५-१६ मध्ये, १००० मुलांमागे ९१९ मुली होत्या, ज्या २०१९-२१ मध्ये १००० मुलांमागे ९२९ मुली झाल्या आहेत.

गाव अजूनही शहराच्या पुढेच

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS-5) मधील डेटा गाव आणि शहरातील लिंग गुणोत्तराची तुलना करतो. सर्वेक्षणानुसार, शहरांच्या तुलनेत खेड्यांमध्ये लिंग गुणोत्तर चांगले आहे. खेड्यांमध्ये दर १,००० पुरुषांमागे १,०३७ महिला आहेत, तर शहरांमध्ये ९८५ महिला आहेत. याआधी NFHS-4 (२०१९-२०२०) मध्ये खेड्यांमध्ये १,००० पुरुषांमागे १,००९ महिला होत्या आणि शहरांमध्ये ही संख्या ९५६ होती.

( हे ही वाचा: भारतात लोकसंख्येचा स्फोट थांबणार?; देशात प्रजनन दरात घट, गर्भनिरोधकांचा सर्वाधिक वापर )

देशातील प्रजनन दरात घट

देशाच्या वाढत्या लोकसंख्येबाबत चांगली बातमी समोर येत आहे. खरं तर, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 च्या दुसऱ्या टप्प्यानुसार, देशातील एकूण जननक्षमता दर (TFR) किंवा स्त्रीने जन्माला मुलांची सरासरी संख्या २.२ वरून २ वर आली आहे. तर गर्भनिरोधक प्रसार दर (CPR) देखील वाढला आहे आणि ५४ टक्क्यांवरून ६७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.