नवी दिल्ली: नॅशनल हेराल्डप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. याप्रकरणी ईडीने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यास कनिष्ठ न्यायालयाने नकार दिला होता. त्याविरोधात ईडीने उच्च न्यायालयात याचिका जाखल केली आहे. न्या. स्वर्ण कांता शर्मा यांच्या पीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी सूचिबद्ध करण्यात आली आहे.
कनिष्ठ न्यायालयाने गेल्या वर्षी १६ डिसेंबरला ईडीच्या आरोपपत्राची दखल घेण्यास नकार दिला होता. याप्रकरणी ईडीची तक्रार कायद्याने निषिद्ध आहे, कारण त्याचा उल्लेख एफआयआरमध्ये नव्हता, असे कनिष्ठ न्यायालयाच्या निकालात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाला स्थगिती द्यावी अशी विनंती करणारी याचिका ईडीने दाखल केल्यानंतर, उच्च न्यायालयाने २२ डिसेंबरला सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह सुमन दुबे, सॅम पित्रोदा यांना तसेच यंग इंडिया कंपनीला नोटीस बजावली होती. त्याप्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे.
