नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना समन्स बजावलेले आहे. त्यानंतर आज (गुरुवार) सोनिया गांधी या चौकशीसाठी ‘ईडी’ कार्यालयात हजर होणार आहेत. तर, दुसरीकडे ईडी कडून सुरू झालेल्या या चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने ईडी व मोदी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आज देखील काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर सुरू असलेली कारवाई म्हणजे राजकीय सूड असल्याचं काँग्रेसने म्हटलेलं आहे. या अगोदर देखील ईडी कडून समन्स बजावण्यात आल्यापासून देशभरात काँग्रेसकडून जागोजागी आंदोलन करण्यात आलेली आहेत.

“आज संपूर्ण देश मोदी सरकारची राजकीय सूडबुद्धी, हुकूमशाही आणि गुंडगिरी पाहत आहे. पण आम्ही ईडी-सीबीआयसारख्या कठपुतळ्यांना घाबरत नाही.” असं काँग्रेसने ट्वीटद्वारे म्हटलेलं आहे.

पक्षाचे वरिष्ठ नेते नवी दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात निदर्शनांसाठी एकत्र येणार आहेत, तर काँग्रेस खासदार संसदेत देखील आंदोलन करण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून इंडियन एक्स्प्रेसला मिळालेल्या माहितीनुसार , काँग्रेसने विरोधी पक्षांना देखील एकजुटीने त्यांच्या निषेधात सामील होण्याची विनंती केलेली आहे.