मुंबई : देशातील वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल घडवण्याच्या दिशेने नॅशनल मेडिकल कमीशन (एनएमसी) ने धाडसी पाऊल उचलले आहे. एका बाजूला मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठीचे नियम सुलभ करून दरवाजे अधिक उघडले जात असताना, दुसऱ्या बाजूला पदव्युत्तर (पीजी) शिक्षणासाठी कठोर निकष लागू तकरण्याची यारी सुरू आहे. ‘संख्या वाढवायची, पण गुणवत्ता घसरू द्यायची नाही,’ हा स्पष्ट संदेश या प्रस्तावातून दिला जात आहे.

नव्या मसुदा नियमांनुसार मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठीची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे. यामुळे ट्रस्ट, सोसायटी आणि काही प्रमाणात कंपन्यांनाही या क्षेत्रात प्रवेशाची संधी मिळू शकते. सध्या अनेक भागांमध्ये मेडिकल कॉलेजांची कमतरता असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना मर्यादित जागांसाठी तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत नियम शिथिल केल्यास अधिक संस्था पुढे येतील आणि वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये डॉक्टरांची कमतरता ही गंभीर समस्या आहे. अधिक मेडिकल कॉलेज उभारले गेल्यास स्थानिक स्तरावर डॉक्टर तयार होण्यास मदत होईल आणि आरोग्य सेवा अधिक सुलभ होऊ शकते. मात्र या सुलभतेमुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ नये यासाठीच एनएमसीने पीजी शिक्षणासाठी कडक भूमिका घेतल्याचे दिसून येते.पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रस्तावित नियमांनुसार संबंधित कॉलेजांकडे पुरेशी पायाभूत सुविधा, आवश्यक रुग्णभार, अत्याधुनिक उपकरणे आणि अनुभवी शिक्षकवर्ग असणे बंधनकारक केले जाणार आहे.

तज्ज्ञ डॉक्टर तयार करण्यासाठी केवळ सैद्धांतिक शिक्षण पुरेसे नसून प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि क्लिनिकल अनुभव अत्यावश्यक असतो. त्यामुळे पीजी शिक्षणाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा संदेश या प्रस्तावातून दिला गेला आहे. याशिवाय, सशस्त्र दलातील डॉक्टरांना देशभर एकाच परवान्याने वैद्यकीय सेवा देण्याची मुभा देण्याचाही विचार करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आपत्कालीन परिस्थितीत किंवा गरजेच्या वेळी डॉक्टरांची उपलब्धता वाढू शकते. तसेच नियमन प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यावरही भर देण्यात आला आहे.

सध्या हा मसुदा सार्वजनिक अभिप्रायासाठी खुला ठेवण्यात आला असून विविध घटकांकडून सूचना आणि आक्षेप मागवले जात आहेत. या अभिप्रायांच्या आधारे अंतिम नियम तयार केले जाणार आहेत.एकूणच मेडिकल कॉलेजांची संख्या वाढवून आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळाची गरज भागवणे आणि त्याचवेळी तज्ज्ञ डॉक्टरांच्या गुणवत्तेची पातळी उंचावणे, या दोन महत्त्वाच्या उद्दिष्टांचा समतोल साधण्याचा प्रयत्न एनएमसी करत असल्याचे एनएमसीच्या सूत्रांचे म्हणणे आहे.