मी हलके नाणे नव्हे!; ‘राष्ट्रीय लोक दला’चे प्रमुख जयंत सिंह यांचे अमित शहांना प्रत्युत्तर

दिल्लीमध्ये बुधवारी भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांच्या निवासस्थानी केंद्रीयमंत्री संजीव बालियान यांच्या पुढाकाराने जाट नेत्यांची बैठक बैठक घेण्यात आली.

‘राष्ट्रीय लोक दला’चे प्रमुख जयंत सिंह यांचे अमित शहांना प्रत्युत्तर

नवी दिल्ली : ‘मी हलके नाणे नव्हे की, मनात येईल तेव्हा पलटी मारेन. उत्तर प्रदेशमधील विधानसभेची निवडणूक ही सन्मानाची लढाई आहे. शेतकऱ्यांच्या स्वाभिमानासाठी ही लढाई मी लढत आहे. भाजप जात आणि धर्माच्या आधारे समाजांमध्ये दुफळी निर्माण करू पाहात आहे’, अशा शब्दांत ‘राष्ट्रीय लोक दला’चे प्रमुख चौधरी जयंत सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ‘पाठिंब्या’च्या आवाहनाला प्रत्युत्तर दिले.

पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये १० फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार असून सर्वच राजकीय पक्षांनी बागपत, शामली, मेरठ, मुझफ्फरनगर, गाजियाबाद, हापुड, बुलंदशहर, अलिगढम्, मथुरा, आग्रा, अमरोहा, बिजनौर, सहारनपूर, नोएडा आदी पश्चिमी भागांतील मतदारसंघांकडे मोर्चा वळवला आहे. चौधरी जयंत सिंह यांच्या ‘राष्ट्रीय लोक दला’ने अखिलेश यादव यांच्या ‘समाजवादी पक्षा’शी युती केली आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील १०० हून विधानसभा मतदारसंघात इथल्या जाट मतदारांचा कल निर्णयक असून हाच ‘राष्ट्रीय लोक दला’चा प्रमुख मतदार राहिला आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र जाट मतदारांनी भाजपला पाठिंबा दिला होता. गेल्या वेळी पहिल्या टप्प्यातील ७३ मतदारसंघात भाजपला ४५ टक्के मते मिळाली होती. तर, अजित सिंह यांच्या नेतृत्वाखाली ‘राष्ट्रीय लोक दला’ला ६ टक्के मते मिळाली होती.

दिल्लीमध्ये बुधवारी भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांच्या निवासस्थानी केंद्रीयमंत्री संजीव बालियान यांच्या पुढाकाराने जाट नेत्यांची बैठक बैठक घेण्यात आली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. शेतकरी आंदोलनानंतर भाजपवर नाराज असलेल्या जाट मतदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. जाट समाजाची नाराजी दूर केली जाईल, असे आश्वासन शहा यांनी बैठकीत दिले. त्यानंतर, प्रवेश वर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना जयंत चौधरी यांनाही ‘सप’ची साथ सोडून भाजपला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

शहा आणि वर्मा यांच्या आवाहनावर चौधरी यांनी मात्र टीका केली आहे. उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांनी भाजपच्या जुमल्यांपासून सावध रहावे. भाजपचा विभाजनाचा डाव हाणून पाडा. एकजुटीने (हिंदू-मुस्लिम) राहा. शेतकऱ्यांना चिरडले तेव्हा पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी, केंद्रीय गृहमंत्री शहा कुठे होते, असा प्रश्न विचारत चौधरी जयंत सिंह यांनी गुरुवारी शेतकऱ्यांना लखीमपूर हत्याकांडाची आठवण करून दिली. मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या दंगलीनंतर हिंदू-मुस्लिमांमध्ये तणावाचे वातावरण होते. मात्र, यावेळी हिंदू जाट व मुस्लिम या समाजांनी भाजपविरोधात मतदान करण्याचे आवाहन सप-राष्ट्रीय लोक दल युतीने केले आहे. चौधरी मुझफ्फरनगरच्या दौऱ्यावर असून शुक्रवारी ते व अखिलेश यादव संयुक्त पत्रकार परिषदही घेणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: National people party jayant singh union home minister amit shah akp

Next Story
‘टाटा एअरलाइन्स’ ते एअर इंडियाते टाटा समूह : ६९ वर्षांचा प्रवास
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी