Ajit Doval : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भारतीय मुस्लिम समाजाच्या काही निवडक सदस्यांची आज (१८ एप्रिल) पंतप्रधान कार्यालयात महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुस्लिम समाजातील विविध क्षेत्रांतील सदस्यांचा समावेश होता. या बैठकीदरम्यान अजित डोवाल यांनी भारतीय मुस्लिमांना आश्वासक संदेश दिला आहे.
‘आपण समुद्र एकत्र पार करू किंवा एकत्रच जलसमाधी घेऊ, म्हणजे हिंदू-मुस्लीम सहप्रवासी आहेत, एकत्र जगू किंवा एकत्र मरू’, असा आश्वासक संदेश अजित डोवाल यांनी या बैठकीतून दिला आहे. भारतात राहणारे हिंदू आणि मुस्लिम हे एकाच जहाजातील प्रवाशांसारखे असल्याचं मत अजित डोवाल यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान, या बैठकीचा उद्देश हा राजकारणाच्या पलीकडे जाऊन मुस्लिम समाजाच्या विकासासाठी आणि शिक्षण आणि उद्योजकतेबाबत चर्चा करणं हा उद्देश असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
या बैठकीत कोण-कोण सहभागी झालं होतं?
शिक्षणतज्ज्ञ जफर सरेशवाला, केपी ग्रुपचे संस्थापक फारुक पटेल, जर्मन स्टीलचे सीएमडी इनामुल राकी, जर्मन स्टीलचे कार्यकारी संचालक इबरार इराकी, निटॉन व्हॉल्व्हजचे सीईओ जुनैद शरीफ, जीएलएस स्विचगियरचे संचालक झफर लारी, दाऊदी बोहरा जमात नेते अल्ताफ सादिकोट, अंजुमन-ए-इस्लामचे अध्यक्ष झहीर काझी, समाजसेविका हाजी रायमा, हज कमिटी इंडियाच्या अध्यक्षा कौसर जहाँ, पर्यावरणवादी कार्यकर्ते साहेर भामला, एम्सचे डॉक्टर निशात हुसेन, अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या (एएमयू) कुलगुरू नैमा खातून आणि पत्रकार समिना शेख यांचा या बैठकीत सहभाग होता.
जफर सरेशवाला यांनी काय म्हटलं?
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या भेटीसंदर्भात बोलताना जफर सरेशवाला यांनी सांगितलं की, “अजित डोवाल यांनी आमच्या प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतलं. यानंतर अजित डोवाल यांनी देशातील धर्मांमधील एकतेच्या महत्त्वावर भर दिला आणि ते म्हणाले की, भारत एक जहाज आहे. त्यामुळे आपण समुद्र एकत्र पार करू किंवा एकत्रच जलसमाधी घेऊ”, असा संदेश अजित डोवाल यांनी दिला असल्याचं जफर सरेशवाला यांनी सांगितलं आहे.
“सरकारने आम्हाला या बैठकीसाठी आमंत्रित केलं म्हणजे हे एक सकारात्मक चित्र आहे”, असं जफर सरेशवाला यांनी सांगितलं. दरम्यान, या बैठकीत आम्हाला सर्वांना समान संधी मिळावी, अशी मागणी आम्ही केली होती. तसेच आम्ही असंही सांगितलं होतं की मुस्लिमांबरोबर कोणताही भेदभाव केला जाऊ नये, तसेच आम्ही भविष्यातही हे असंच सुरू ठेवणार आहोत, असंही जफर सरेशवाला यांनी म्हटलं.
या बैठकीतून काय सकारात्मक संदेश दिला?
दरम्यान, या बैठकीबाबत झहीर काझी यांनी म्हटलं की, “या बैठकीमुळे एक सकारात्मक संदेश गेला आहे. कारण सरकारमध्ये असे लोक आहेत जे अल्पसंख्याकांचं म्हणणं ऐकून घेण्यास तयार आहेत. अशा प्रकारच्या संवादामुळे गैरसमज दूर होण्यास मदत होते. त्यामुळे असंच सुरु राहिलं तर संबंध सुधारण्यास मदत होईल.”
‘अजित डोवाल खऱ्या आयुष्यातील धुरंधर’
“अजित डोवाल हे खऱ्या आयुष्यातील धुरंधर आहेत. कारण ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. तसेच ते एक व्यवहारवादी व्यक्तिमत्व आहेत. आज त्यांनी भारतीय मुस्लिम समाजातील आणि तेही वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना पंतप्रधान कार्यालयात आमंत्रित केलं होतं”, असं ज्येष्ठ पत्रकार शीला भट्ट यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
जफर सरेशवाला यांनी मानले अजित डोवाल यांचे आभार
जफर सरेशवाला यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये अजित डोवाल यांचे आभार मानले आहेत. जफर सरेशवाला यांनी म्हटलं की, “आम्हाला तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल आणि आमचं म्हणणं तुम्ही संयमाने ऐकून घेतल्याबद्दल आणि राष्ट्रीय विकासासाठी चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत”. एक अत्यंत अद्भुत संवाद असा उल्लेख जफर सरेशवाला यांनी केला आहे.
