गुजरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने ग्रामीण भागांत चांगलीच मुसंडी मारली असून भाजपने शहरी भागांवर आपले वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळविले आहे. गुजरातमधील ३१ जिल्हा पंचायतींपैकी १८ ठिकाणी काँग्रेसने आघाडी घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना १२ वर्षे जवळपास प्रत्येक निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेसने गुजरातमधील जिल्हा पंचायत निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी केली असल्याने हा भाजप सरकारविरोधातील निकाल असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
नरेंद्र मोदी यांच्या राज्यात भाजपने जवळपास सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व प्रस्थापित केले होते. गुजरातमधील पटेल आरक्षण आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर सत्तारूढ पक्षासाठी या निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात होत्या. त्याचप्रमाणे आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा स्वीकारल्यानंतर होणाऱ्या या पहिल्याच निवडणुका असल्याने त्याला वेगळे महत्त्वही प्राप्त झाले होते. काँग्रेसने ३१ जिल्हा पंचायतींपैकी १८ ठिकाणी आघाडी घेतली आहे, २०१० च्या निवडणुकीत भाजपने ३० ठिकाणी विजय प्राप्त केला होता ते पाहता आता काँग्रेसने चांगलीच मुसंडी मारली आहे. राज्यातील २३० तालुका पंचायतींमध्ये एकूण ४७७८ जागा असून काँग्रेस २२०४ जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप १७९८ जागांवर आघाडीवर आहे.भाजपने अहमदाबाद, सुरत, राजकोट, वडोदरा, जामनगर आणि भावनगर या सहा महापालिकांमध्ये आघाडी कायम ठेवली आहे. तर ५६ नगरपालिकांपैकी ३४ ठिकाणी भाजप आघाडीवर आहे, तर काँग्रसने नऊ ठिकाणी आघाडी घेतली आहे. काँग्रेसने २०१० मध्ये सहा महापालिका ताब्यात घेतल्या होत्या.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोळंकी म्हणाले की, राज्यातील ही छोटी निवडणूक असून काँग्रेसने ग्रामीण भागांत मुसंडी मारली आहे. हा राज्य सरकारविरोधातील निकाल आहे.

सहा महापालिकांसाठी मतदान केवळ ४५ टक्केच झाले होते तर अन्य निमशहरी आणि ग्रामीण भागांत ६० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या लोकप्रियतेचा कस लावणारी निवडणूक या दृष्टीनेही पाहिले जात होते. त्याचप्रमाणे पटेल आरक्षण आंदोलनाची पाश्र्वभूमीही या निवडणुकीला होती.

राज्यात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण नाही