Navjot Kaur Sidhu on Punjab CM in Congress : पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नी काँग्रेस नेत्या नवज्योत कौर सिद्धू यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे पंजाबसह देशाच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आलं आहे. “काँग्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी ५०० कोटी रुपयांची गरज असते”, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भारतीय जनता पार्टी व आम आदमी पार्टीने ‘हीच काँग्रेसची कार्यप्रणाली असल्याची’ प्रतिक्रिया दिली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार भाजपा व आपने नवज्योत कौर सिद्धू यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की “नवज्योत कौर यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या कारभाराचं ‘काळं सत्य’ उघड झालं आहे. तसेच काँग्रेस पक्ष ‘पैसा व मालमत्तेच्या’ राजकारणात गुंतलेला असल्याचा हा पुरावा आहे.

काँग्रेसचा आक्षेप

दुसऱ्या बाजूला नवज्योत कौर यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. काँग्रेस खासदार तथा माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांनी या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, “नवज्योत कौर यांचे पती माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे स्वतःच पक्ष देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहेत. यात आता नवज्योत कौर सहाय्य करत आहेत.”

नवज्योत कौर सिद्धू नेमकं काय म्हणाल्या?

नवज्योत कौर यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या, “काँग्रेसने त्यांना पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केलं तर त्यांचे पती सक्रीय राजकारणात परत येतील. आम्ही नेहमीच पंजाब व पंजाबी लोकांबंद्दल, इथल्या संस्कृतीबद्दल बोलत असतो, परंतु, मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी आमच्याकडे ५०० कोटी रुपये नाहीत. पंजाबमध्ये २०२७ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.” या निवडणुकीच्या तयारीवरून प्रश्न विचारल्यावर नवज्योत कौर सिद्धू यांनी सदर वक्तव्य केलं.

आम आदमी पार्टीचा टोला

पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पार्टीचे प्रदेश सरचिटणीस बालतेज पन्नू म्हणाले, “नवज्योत कौर यानी काँग्रेसमधील भानगडी समोर आणल्या आहेत. काँग्रेस नेमकी कशी काम करते ते या वक्तव्यामुळे स्पष्ट झालं आहे. काँग्रेसचं नेतृत्त्व कसं ठरतं ते देखील यामुळे आपल्याला समजलं. हे लोक वैयक्तिक महत्त्वकांक्षा व त्यांच्या आर्थिक फायद्यांसाठी पंजाबचं हित बाजूला कसं ठेवतात ते यातून स्पष्ट झालं आहे. त्यांच्यासाठी पंजाबपेक्षा त्यांचा पक्ष, पैसे व वैयक्तिक फायदे महत्त्वाचे आहेत.”