उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ात शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराचं प्रकरण आता चिघळलं आहे. या प्रकरणी, मोदी सरकारविरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, काँग्रेसच्या महसचिव प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून झालेल्या अटकेनंतर काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी थेट उत्तर प्रदेश सरकारला इशारा दिला आहे. “जर उद्यापर्यंत (६ ऑक्टोबर) प्रियंका गांधींची पोलीस कोठडीतून सुटका केली गेली नाही तर पंजाब काँग्रेस उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीच्या दिशेने मोर्चा काढेल”, असा इशारा नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज (५ ऑक्टोबर) संध्याकाळी ट्विट करत उत्तर प्रदेश सरकारला हा इशारा दिला आहे. “जर उद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येमागे असलेल्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला अटक झाली नाही आणि शेतकऱ्यांसाठी लढताना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आलेल्या आमच्या नेत्या प्रियंका गांधी यांची सुटका करण्यात आली नाही तर पंजाब काँग्रेस लखीमपूर खेरीच्या हिंसाचार झालेल्या ठिकाणच्या दिशेने मोर्चा काढेल!”, असं ट्विट नवज्योतसिंग सिद्धू यांनी केलं आहे.

लखीमपूर घटनेनंतर शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या प्रियंका गांधींना पोलिसांनी सोमवारी (४ ऑक्टोबर) ताब्यात घेऊन सीतापूरमधील विश्रामगृहात ठेवलं होतं. पण आता प्रियंका यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे, काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. त्याचप्रमाणे, सीतापूरमधील या विश्रामगृहातच तात्पुरतं जेल उभारण्यात आलं आहे.

“तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का?”

प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या लखनऊ दौऱ्यापूर्वी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. “तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का?” असं विचारताना प्रियांका त्यांनी आपल्या मोबाईलमधला एक व्हिडीओ दाखवला. या व्हिडिओमध्ये असं दिसून येत आहे की, शांतपणे चालणाऱ्या शेतकऱ्यांच्या थेट अंगावर गाडी घातली गेली. दरम्यान, प्रियांका गांधींनी हा व्हिडीओ लखीमपूर खेरीचा असल्याचा दावा केला आहे.

पुढे सवाल करत प्रियांका म्हणाल्या, “या माणसाला अटक का केली गेली नाही? लखीमपूर खेरीला भेट द्यायची आहे अशा आमच्यासारख्या नेत्यांना कोणत्याही एफआयआरशिवाय ताब्यात घेण्यात आलं आहे. मग, मला हे जाणून घ्यायचं आहे की हा माणूस मुक्त का आहे?”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navjot sidhu warns up congress priyanka gandhi arrest lakhimpur gst
First published on: 05-10-2021 at 18:17 IST