गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे पंजाब प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंग सिद्धू यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धू पोलीस विभागाविषयी आक्षेपार्ह भाषेमध्ये भर सभेत वक्तव्य करताना दिसत आहेत. या विधानावर सर्वच स्तरातून निषेध केला जात असतानाच पोलिसांचं समर्थन देखील केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर चंदीगडचे पोलीस उपअधीक्षक अर्थात डीएसपी दिलशेर सिंग चंडेल यांनी सिद्धूंना खरमरीत उत्तर दिलं आहे. तसेच, त्यांच्या विधानावर तीव्र नापसंती दर्शवली असून त्यांना नोटीस देखील पाठवली जाणार असल्याचं सांगितलं आहे.

डीएसपींची आगपाखड

नवज्योत सिंग सिद्धू यांच्या विधानावर डीएसपी चंडेल यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. “नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मला अतीव दु:ख झालं आहे. पोलिसांविषयी त्यांनी केलेल्या विधानाचा मी पोलीस दलातर्फे, पंजाब पोलीस आणि चंदीगड पोलिसांकडून तीव्र निषेध करतो. त्यांच्या विधानासाठी त्यांना नोटीस पाठवण्याचा देखील मी निर्णय घेतला आहे. राज्य सरकारचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्याकडून अशा प्रकारचं वक्तव्य स्वीकारार्ह नाही”, असं ते म्हणाले आहेत.

“हे तेच पोलीस आहेत, जे लोकांना राजकीय नेत्यांच्या सूचना पाळायला लावतात. पोलिसांशिवाय एक साधा रिक्षावालाही या राजकीय नेत्यांच्या सूचनांचं पालन करणार नाही”, अशा शब्दांत डीएसपी चंडेल यांनी सिद्धूंना सुनावलं आहे.

काय म्हणाले होते सिद्धू?

१९ डिसेंबर रोजी पंजाबच्या कपूरथला जिल्ह्यातील सुलतानपूर लोधी भागामध्ये झालेल्या जाहीर सभेत नवज्योतसिंग सिद्धूंनी हे विधान केलं होतं. स्थानिक काँग्रेस आमदार नवतेज सिंग चीमा यांचं कौतुक करताना सिद्धूंनी पोलिसांविषयी आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केली होती. “नवतेज चीमा हे त्यांच्या काळात इतके खमके होते, की त्यांच्या भितीने पोलिसांना देखील पँट ओली करायला लावत होते”, असं सिद्धू म्हणाले होते.

यावरून चंडेल यांनी नाराजी व्यक्त करताना म्हटलं, “जर नवज्योत सिंग सिद्धू यांना पोलिसांबद्दल काही तक्रार असेलच, तर त्यांना मिळत असलेली पोलीस सुरक्षा त्यांनी नाकारावी. तुम्ही या विधानामुळे संपूर्ण पंजाब पोलिसांचा अपमान केला आहे”.

“…पण आता तेच मोदींचे तळवे चाटतायत”; कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर नवज्योतसिंग सिद्धूंची टीका

दरम्यान, नवज्योत सिंग सिद्धू यांनी यावर अद्याप कोणताही खुलासा केलेला नसला, तरी हे विधान त्यांनी विनोद म्हणून केलं होतं, असं त्यांच्या निकटवर्तीयाने सांगितल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं म्हटलं आहे.