सिद्धू यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; एका मंत्र्याकडूनही पदत्याग

चंडीगड : आगामी निवडणुकीच्या तोंडावर खांदेपालट करून सामाजिक समीकरण जुळवत विरोधकांना शह देण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसलाच मंगळवारी पंजाबमध्ये मोठा धक्का बसला. नवज्योतसिंग सिद्धू यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्यापाठोपाठ एका मंत्र्यानेही पदत्याग केला. त्यामुळे पंजाब काँग्रेसमधील पक्षांतर्गत संघर्ष तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले.

पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी नव्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करताच सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला. मात्र, पक्षाचे काम करतच राहणार असल्याचे सिद्धू यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे.

पंजाब काँग्रेसच्या नेतृत्वावरून अमरिंदर सिंग यांच्याशी संघर्षांनंतर सिद्धू यांच्याकडे जुलैमध्ये प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही पक्षांतर्गत संघर्ष कायम राहिला. अखेर दहा दिवसांपूर्वी अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवून या पदावर चरणजीतसिंग चन्नी यांची वर्णी लावण्यात आली. ते राज्याचे पहिले दलित मुख्यमंत्री बनले. त्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अनेक जण नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच खातेवाटपातूनही पक्षांतर्गत कुरबुरी असल्याचे सिद्धू यांच्या राजीनाम्यामुळे स्पष्ट झाले. सिद्धू यांना पाठिंबा देण्यासाठी पंजाबच्या मंत्री रझिया सुलतान यांनीही राजीनामा दिला.

सिद्धू हे स्थिर नसून, सीमेवर असलेल्या पंजाबच्या नेतृत्वासाठी योग्य नसल्याची प्रतिक्रिया अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केली. अमरिंदर हे सध्या दिल्लीत असून, आता त्यांच्याबरोबरच सिद्धू यांच्या राजकीय हालचालींकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

कन्हैयाकुमार काँग्रेसमध्ये

जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार यांनी मंगळवारी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनीही या वेळी काँग्रेस परिवारात दाखल झाल्याचे सांगितले. मात्र, अपक्ष आमदार असल्याने तांत्रिक मुद्दय़ावर त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश झाला नाही.