पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत कलह सुरू आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि नवजोत सिंह सिद्धू यांच्यातील वाद काँग्रेस श्रेष्ठींपर्यंत पोहोचला आहे. त्यात आता नवजोत सिंह सिद्धू यांनी आम आदमी पक्षावर स्तुतीसुमनं उधळल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे २०२२ विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. नवजोत सिंह सिद्धू गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस सरकार आणि मागच्या बादल सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. त्यामुळे नवजोत सिंह सिद्धू आम आदमी पक्षात जाणार का? ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

“माझी दूरदृष्टी आणि पंजाबमधील काम आम आदमी पक्षानं ओळखलं आहे. पंजाबमधील ड्रग्स, शेतकरी, भ्रष्टाचार आणि वीज संकटाबद्दल मी २०१७ पूर्वी मुद्दा उचलला होता. आज मी पंजाब मॉडेल समोर आणतो. तेव्हा पंजाबसाठी कोण लढा देत आहे?, हे त्यांना माहिती आहे.” असं काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू यांनी सांगितलं. या ट्वीटनंतर नवजोत सिंह सिद्धू आम आदमी पक्षात प्रवेश करणार?, या चर्चांना उधाण आलं आहे. आम आदमी पक्षाचे खासदार आणि पंजाब प्रमुख भगवंत मान यांनी सोशल मीडियावरून सिद्धू यांना प्रश्न विचारला होता. “सिद्धू थर्मल प्लांटद्वारे काँग्रेसला वर्गणी दिली जात असल्याच्या मुद्द्यावर गप्प का आहेत?”, असा प्रश्न भगवंत मान यांनी विचारला होता. त्यावर नवजोत सिंह सिद्धू यांनी हे उत्तर दिलं आहे.

नवजोत सिंह सिद्धू यांनी काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला होता. “दिल्ली मॉडेल नाही तर पंजाब मॉडेलची गरज आहे. नैतिकतेच्या आधारावर राजकारण होत नसल्याने राजकारणात नकारात्मक प्रचार होत आहे. राजकारण फक्त धंद्यासाठी केलं जात आहे. त्यामुळे विकासाशिवाय राजकारणात काहीच तथ्य नाही”, असं ट्वीट नवजोत सिंह सिद्धू यांनी केलं होतं.

मुलाच्या कामगिरीमुळे काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी भावुक; म्हणाल्या…!

गेल्या काही दिवसांपासून पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि नवजोत सिंह सिद्धू याच्या वाद सुरु आहे. सिद्धू काँग्रेस पक्षात आणि पंजाब सरकारमध्ये महत्त्वपूर्व पदासाठी आग्रही आहेत. मात्र अमरिंदर सिंह त्यांना मंत्रिमंडळात सहभागी करू इच्छित नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे त्यांचा वाद दिल्ली दरबारी पोहोचला होता. मात्र तिथेही या प्रकरणावर तोडगा निघू शकलेला नाही.