पंजाबमधली राजकीय खळबळ शांत होण्याचं नावच घेत नाही. नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने आता नवा पेच निर्माण झाला आहे. आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सुपूर्द करताना सिद्धू यांनी लिहिलं आहे की पंजाबच्या भविष्यासोबत आपल्याला कोणतीही तडजोड करायची नाही.

सिद्धू यांनी राजीनाम्याचं कारण जरी पत्रात सांगितलं नसलं तरी नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यासोबत सिद्धू यांचं पटत नसल्याच्या चर्चा आहेत. यामुळेच सिद्धू यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे. आजतकने याविषयीचं सविस्तर वृत्त दिलं आहे. सोनिया गांधी यांना पाठवलेल्या राजीनाम्याच्या पत्रात सिद्धू लिहितात, तडजोड केल्याने माणसाचं चरित्रच संपुष्टात येतं. मी पंजाबच्या भविष्यासोबत तडजोड करु शकत नाही. त्यामुळे मी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. मात्र, आगामी काळात काँग्रेससाठी काम करतच राहीन.

हेही वाचा – पंजाबमध्ये राजकीय भूकंप ; नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा!

या कारणांमुळे नाराज आहेत सिद्धू!

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, सिद्धू यांच्या नाराजीची ही काही कारणे आहेत.
१. नव्या मंत्रिमंडळात जशा पद्धतीने खातेवाटप झालं, ते सिद्धू यांना पटलेलं नाही.
२. नव्या मंत्रिमंडळात सुखविंदर सिंह रंधावा यांना गृहमंत्रिपद देण्यात आलं आहे. याला सिद्धू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा विरोध आहे.
३. अमृतसर सुधार ट्रस्टचं पत्र चरणजीत सिंह चन्नी यांच्या हस्ते देण्यात आलं, मात्र ते सिद्धू यांना द्यायची इच्छा होती.
४. काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे सिद्धू नाराज असल्याची चर्चा आहे.

याच महिन्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासोबतच्या प्रदीर्घ वादविवादांनंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री झाले. नुकतंच चन्नी यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. १५ नेत्यांना मंत्रिमंडळात सहभागी करुन घेतलं असून त्यापैकी सात पदांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.