Navjyot Kaur Sidhu: पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नी काँग्रेस नेत्या नवज्योत कौर सिद्धू यांनी एक वक्तव्य केलं होतं. ‘काँग्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी ५०० कोटी रुपयांची गरज असते’, असं नवज्योत कौर सिद्धू यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. नवज्योत कौर सिद्धू यांच्या या विधानानंतर भारतीय जनता पक्षानेही काँग्रेसवर टीकेची झोड उठवली होती.
त्यानंतर आता नवज्योत कौर सिद्धू यांच्यावर काँग्रेस पक्षाने मोठी कारवाई केली आहे. नवज्योत कौर यांचं काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा यांनी नवज्योत कौर सिद्धू यांना तात्काळ पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली आहे. या कारवाईमुळे नवज्योत कौर सिद्धू यांना मोठा धक्का बसला आहे. या संदर्भातील वृत्त जनसत्ताने दिलं आहे.
नवज्योत कौर सिद्धू नेमकं काय म्हणाल्या होत्या?
नवज्योत कौर यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या, “काँग्रेसने त्यांना पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केलं तर त्यांचे पती सक्रीय राजकारणात परत येतील. आम्ही नेहमीच पंजाब व पंजाबी लोकांबंद्दल, इथल्या संस्कृतीबद्दल बोलत असतो, परंतु, मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी आमच्याकडे ५०० कोटी रुपये नाहीत. पंजाबमध्ये २०२७ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.” या निवडणुकीच्या तयारीवरून प्रश्न विचारल्यावर नवज्योत कौर सिद्धू यांनी सदर वक्तव्य केलं होतं.
काँग्रेसचा आक्षेप
नवज्योत कौर यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. काँग्रेस खासदार तथा माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांनी या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलं होतं. ते म्हणाले होते की, “नवज्योत कौर यांचे पती माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू हे स्वतःच पक्ष देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहेत. यात आता नवज्योत कौर सहाय्य करत आहेत.”
नवज्योत कौर सिद्धू यांनी स्पष्टीकरणही दिलं होतं
नवज्योत कौर यांचं विधान सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांनी म्हटलं होतं की, “माझ्या सरळ विधानाचा विपर्यास करण्यात आल्याने मला धक्का बसला. मी फक्त एवढंच म्हटलं की काँग्रेसने आमच्याकडे कधीही काहीही मागितलं नाही. जेव्हा मला विचारण्यात आलं की,नवज्योत सिंह सिद्धू इतर कोणत्याही पक्षातून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनू शकतात का? तेव्हा मी म्हटलं की आमच्याकडे मुख्यमंत्रिपदासाठी कोणालाही देण्यासाठी पैसे नाहीत.”
