scorecardresearch

नवज्योतसिंग सिद्धूंनी पुन्हा दिला उपोषणाचा इशारा, आपल्याच पक्षाच्या सरकारविरोधात थोपटले दंड!

नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारविरोधात पुन्हा एकदा टीका करताना उपोषणाचा इशारा दिला आहे.

navjyotsingh siddhu on hunger strike
डावीकडे पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी, उजवीकडे नवज्योतसिंग सिद्धू (संग्रहीत छायाचित्र – पीटीआय)

काँग्रेस नेते आणि पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे नेहमीच त्यांच्या वर्तनामुळे किंवा वक्तव्यामुळे चर्चेत असतात. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासोबत असलेल्या मतभेदांवर सिद्धूंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर अमरिंदर सिंग यांना पदाचा आणि पक्षाचाही राजीनामा द्यावा लागला. पक्षश्रेष्ठी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता
पंजाबचे मुख्यमंत्री झालेले चरणजीतसिंग चन्नी यांच्यासोबत देखील नवज्योतसिंग सिद्धू यांचे मतभेद होऊ लागले आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षाच्या सरकारविरोधात दंड थोपटले असून थेट उपोषणालाच बसण्याचा इशारा दिला आहे.

गुरुवारी एका जाहीर सभेत बोलताना नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाबमधील काँग्रेस सरकारच्या कारभारावर टीका केली. ड्रग्जसंदर्भातील अहवाल जाहीर करावा, अशी मागणी नवज्योत सिंग सिद्धू यांनी केली आहे. तसेच, जर सरकारने हा अहवाल जाहीर केला नाही, तर आपण उपोषणाला बसू, असा इशाराच नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सिद्धूंनी आपल्याच पक्षाविरोधात दंड थोपटले आहेत. सिद्धूंच्या या भूमिकेमुळे त्यांच्या आणि मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबचे मुख्यमंत्री असताना नवज्योत सिंग यांचे त्यांच्याशी टोकाचे मतभेद झाले होते. केंद्रीय पक्षश्रेष्ठींनी मध्यस्थी केल्यानंतर हे मतभेद निवळल्याचं देखील दिसून आलं. मात्र, काही दिवसांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तडकाफडकी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे संबंध निवळलेच नसल्याचं स्पष्ट झालं. त्यापाठोपाठ चरणजीतसिंग चन्नी यांना पंजाबचे मुख्यमंत्री बनवण्यात आलं. तसेच नवज्योतसिंग सिद्धू पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाले.

मात्र, चरणजीतसिंग चन्नी यांच्याशीही सिद्धूंचे मतभेद सुरूच राहिले. त्यामुळे नाराज होत सिद्धूंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देखील दिला होता. मात्र, नंतर पक्षश्रेष्ठींनी त्यांची मनधरणी करत त्यांना राजीनामा मागे घ्यायला लावला.

पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी काँग्रेस, आप, भाजपा, शिरोमणी अकाली दल या सर्वच पक्षांनी दंड थोपटले आहेत. त्यात कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नव्याने स्थापन झालेल्या पक्षाचीही भर पडली आहे. त्यामुळे येत्या काळात पंजाबमधील राजकीय घडामोडी अधिकच वाढणार, याचीच नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिलेला उपोषणाचा इशारा ही सुरुवात ठरण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-11-2021 at 19:10 IST

संबंधित बातम्या