भारत हा देश अनेकविध भाषा-परंपरांसाठी ओळखला जातो. आपल्या देशातील प्रत्येक प्रांताची, तिथल्या रीतिभातींची स्वतंत्र अशी वैशिष्ट्ये आहेत. अशीच विविधता भारतात नवरात्रीच्या पूजाविधी, नैवेद्यात व परंपरेतही आढळते.

तमिळनाडूमधील गोलू

तमिळनाडूमधील नवरात्रोत्सव गोलू या नावाने ओळखला जातो. इथे वेगवेगळ्या देवीदेवतांच्या मातीच्या मूर्तीची मांडणी ज्याला पायर्‍या आहेत अशा स्टँडवर केली जाते. सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी सर्वप्रथम गणपती व पारंपरिक बाहुल्यांची स्थापना केली जाते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी इतर मूर्ती ठेवल्या जातात. त्याच्यासभोवती विविध प्रकारची आरास केली जाते. कधी गोकुळ, कधी कैलास पर्वत तर कधी वैकुंठाचे दृश्य तयार केले जाते. प्रत्येक ठिकाणी लक्ष्मीनारायण हा महत्त्वाचा असतो. अष्टलक्ष्मी, दशावतार, दुर्गा देवी, सरस्वती, लग्नाच्या बाहुल्या, गणपती असे अनेक बाहुल्या तेथे ठेवतात. तमिळ संस्कृतीत मुलीच्या लग्नामध्ये आई मुलीला चंदनाच्या लाकडाच्या लक्ष्मी नारायण किंवा व्यंकटेश पद्मावतीच्या मूर्ती देते. या मूर्ती उंचावर ठेवून इतर सर्व बाहुल्या या पायर्‍यांवर मांडल्या जातात. इथल्या परंपरेनुसार दरवर्षी एक नवीन मूर्ती प्रत्येकाला घ्यावीच लागते. या मूर्तींना देवता स्वरूप मानून त्या नृत्य करत आहेत, असं समजतात. दहाव्या दिवशी त्या नृत्य करून दमल्या असतील, या भावनेनं त्यांना त्या पायर्‍यांवरच झोपवलं जातं. नंतर त्या पुढे वर्षभर सांभाळून ठेवल्या जातात. प्रसाद म्हणून मुख्यत्वे ‘शुंडल’ म्हणजे चण्याची उसळ दिली जाते. संध्याकाळी देवांसमोर भक्तिसंगीत आळवलं जातं.

गोव्यातील मखरोत्सव

गोव्यातील नवरात्र हा महाराष्ट्रासारखा गरबा-दांडियाचा उत्सव नसून तो प्रामुख्याने मखरोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. गोव्यात पारंपरिक धार्मिक विधींनी जास्त महत्त्व आहे. गोव्यातील प्रमुख मंदिरांमध्ये हा अनोखा ‘मखरोत्सव’ पाहायला मिळतो. प्रामुख्याने फोंडा तालुक्यात मखरोत्सवाचे विविध प्रकार दिसतात. गोव्यातील मखरोत्सवाचा उगम १६ व्या शतकात आढळतो. साळसेट, तिसवाडी आणि बार्देझ येथील मंदिरांच्या विध्वंसानंतर, स्थानिकांनी मूर्तींना फोंडा येथील गावांमध्ये हलवले होते. मूर्तींना सुरक्षित स्थळी घेऊन जाणार्‍या भक्तांच्या या स्थलांतराचे प्रतीक मखरोत्सवात दिसते, जो गोव्याच्या नवरात्री उत्सवाचा एक अविभाज्य भाग आहे. फक्त देवीच्याच मंदिरात नव्हे तर नागेशी, मंगेशीसारख्या शिव मंदिरांमध्येसुद्धा हा मखरोत्सव बघायला मिळतो. लाकडापासून बनवलेल्या या मखरांवर सुंदर नक्षीकाम केलेले असते. काचेवर केलेल्या विविध चित्राकृती, रंगीबेरंगी फुलांनी केलेली सजावट देवीच्या सौंदर्यात अधिक भर घालतात. नवरात्रात रोज रात्री देवीला मखरात बसवतात. काही मंदिरांमध्ये विविध आसनांवर देवाची मूर्ती बसवली जाते. नऊ दिवस देवाची विविध रूपं तयार करून या चौकटींमध्ये देवी विराजमान होते. रात्री भजनाच्या तालावर मखर फिरवलं जातं. हे मखर समोर, मागे तसंच डाव्या आणि उजव्या हालचालींमध्ये फिरते आणि हे दृश्य पाहताना अंगावर काटा येतो. मखराच्या वेळी तीन-चार प्रकारचे ताल वाजवले जातात आणि या तालाला धरून मखर फिरवलं जातं. अगदीच हळू सुरुवात झालेल्या मखरांची हालचाल तालासोबत वाढत जाते. काही मंदिरात दररोज विविध अवतारात पूजा बांधली जाते. तर काही मंदिरात एकापेक्षा अधिक मूर्ती बसविल्या जातात. नागेशी, शांतादुर्गा, मंगेशी, म्हाळसादेवी या देवळांमध्ये कधी ३ मूर्तींची तर कधी ५ मूर्तींची पूजा बांधली जाते. गोव्यात बहुतांश मंदिरांसमोर तलाव आहेत. नवरात्रोत्सवात एक दिवस मंदिरातील उत्सव मूर्तींचे नौकारोहण केले जाते. याप्रसंगी होडीवर स्टेज करून तो आकर्षक फुलांनी सजवला जातो. यावर मूर्तीला बसवून तिला तलावातून फिरवून आणले जाते. आणि रात्री जागर केला जातो. वेलिंगचे नृसिंह देवस्थान, मंगेशी, मार्दोळ, नागेशी, शांतादुर्गा या मंदिरात नौकारोहण केले जाते. दरवर्षी गोव्यात नवरात्रांत होणारे मखरोत्सव, नौकारोहण, सीमोल्लंघन हे डोळ्यांचे पारणे फेडणारे असतात.

शहाळ्याचे मुखवटे घटस्थापनेसाठी

देवीची वेगवेगळ्या रुपातली पूजा भाविकांना आकर्षित करत असते. काही ठिकाणी देवीचे घटावर, काही ठिकाणी पार्थिव मूर्तीवर, काही ठिकाणी परंपरेने चालत आलेल्या सोन्या-चांदीच्या टाकांवर देवीचे आवाहन केले जाते. पण, रायगड जिल्ह्यातील अलिबाग, उरण, पेण आणि पनवेल तालुक्यांमध्ये मागील चार दशकांपासून शहाळ्यापासून देवीचे मुखवटे तयार करण्याची व तिला देवी स्वरूपात पूजण्याची अनोखी परंपरा आहे. अशाप्रकारचे देवीचे पूजन फक्त याच भागांमध्ये आढळते.

बंगालमधील दुर्गापूजा

बंगाली संस्कृतीत नवरात्रात ‘दुर्गा पूजे’ची विशेष परंपरा आहे. नवरात्राच्या सातव्या दिवसापासून ते विजयादशमीपर्यंत दुर्गादेवीची आराधना बंगाली संस्कृतीत केली जाते. बंगाली समाजात देवी दुर्गेला विशेष महत्त्व असून तिला ‘दुर्गा माँ’ असे संबोधले जाते. देवीच्या मूर्तीबरोबरच गणपती, कार्तिकेय, सरस्वती आणि लक्ष्मी यांच्या मूर्तीचाही समावेश असतो. यात एका भल्या मोठय़ा आडव्या पाटावर या मूर्तींची मांडणी केली जाते. या प्रतिमा पारंपरिकरीत्या बनवण्यासाठी खोर, लाकूड, बांबू, सुतळ, गंगा नदीच्या खोर्‍यातली चिकण माती आणि वाळू ही सामुग्री वापरली जाते. १७५७ साली प्लासीच्या लढाईनंतर दुर्गा पूजा अधिक लोकप्रिय झाली. लज्जतदार बंगाली खाद्यपदार्थांमुळे दुर्गापूजेला खास रंगत येते. दर्शनाला येणार्‍या भक्तांसाठी सर्वत्र खिचुरी, पुरी, बेगुन भाजा, छेनार पायेश असा ‘भोग’ असतो. त्याचबरोबरीने घी भात, वासंती भात, राधावल्लभी (सारणयुक्त पुर्‍या), गोडाच्या पुर्‍या, कोचू साग, खिचुरी, अनेक प्रकारचे वडे, शोर भाजा, निमकी असे हटके पदार्थ आणि सीताभोग, जोयनगरेर मोआ, पंतुआ, लवंग लतिका, जिलबी, छेनार जिलपी, खीर कदम, मालपुवा, केशर पायेश, संदेश, इंद्राणी, हिरामणी, रसमणी, दुर्गाभोग, रसमोहन, खीरकदम, चमचम, लांगचा, खीरमोहन, कांचागोला, चंदन खीर, तालशांश, चंद्रपुली, पंतुआ, पान गाजा, जोलभरा संदेश, लेडी किनी, मिहीदाना अशा मनोरम नावांच्या डझनावारी प्रकारच्या बंगाली मिठायांचा भरगच्च मेन्यू दुर्गाभक्तांच्या दिमतीला असतो.

भुलाबाईचा उत्सव

भुलाबाईचा सण हा मराठवाड्याच्या विदर्भालगतच्या काही जिल्ह्यांसह खान्देशातील जळगाव जिल्ह्यातसुद्धा साजरा होतो. भाद्रपद पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा असा एक महिना हा उत्सव चालतो. कोणी एक दिवसाच्या, कोणी पाच दिवसाच्या, कोणी घटस्थापना ते कोजागरी पौर्णिमा तर कोणी महिनाभर भुलाबाई बसवतात. नवरात्राच्या काळात महाराष्ट्रात होणारा भोंडला हा विदर्भात भुलाबाईच्या नावाने ओळखला जातो. माहेरवाशीण भुलाबाई म्हणजे पार्वती आणि भुलोजी म्हणजे शंकर आणि लहानसा असलेला गणेश म्हणजे गणपती. कैलास पर्वतावर सारीपाट खेळत असताना महादेव हरतात आणि रुसून कैलास सोडून निघून जातात. त्यांना कैलासावर परत आणण्यासाठी पार्वती माता भिल्लिणीचे रूप घेते ती ही भुलाबाई असे सांगितले जाते. शेतकरी घरांमध्ये भुलाबाईचा हा उत्सव सखी पार्वतीचा उत्सव म्हणूनही लहान मुलींमध्ये ओळखला जातो. भुलाबाईचा हा उत्सव वैदर्भीय लोकसंस्कृतीचा, लोकपरंपरेचा अभ्यंग ठेवा आहे. महिनाभर रोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी सगळ्या मुली एकत्र गोळा होऊन एकमेकींच्या घरोघरी जाऊन भुलाबाईची पारंपरिक लोकगीतं म्हणजेच भुलाबाईची गाणी म्हणतात. भुलाबाईची गाणी ही मनोरंजन म्हणून नव्हे तर ती अर्थपूर्ण लोकशिक्षण देणारं साहित्य आहे. भुलाबाईला दिला जाणारा नैवेद्य म्हणजे खिरापत. या नैवेद्यामध्ये रोज नवा खाऊ असतो. हा प्रसाद बंद डब्यात असतो आणि हा प्रसाद काय आहे हे मुलींना ओळखावे लागते. त्यामुळे भुलाबाईची गाणी म्हटल्यावर खिरापत जिंकणे म्हणजे डब्यातील प्रसाद ओळखणे ही एक अनोखी स्पर्धा रंगते. खिरापत ओळखून सांगायचं आकर्षण, कुतूहल म्हणजे अनोख्या बालमहोत्सवाची रंगत कुठल्याही स्पर्धेपेक्षा कमी नाही. शहरी भागात हा भुलाबाईचा उत्सव केवळ एक दिवस कोजागरी पौर्णिमेला साजरा होतो. महाराष्ट्राचा भोंडला, जोगवा आणि गोंधळ महाराष्ट्रात नवरात्रोत्सव काळात भोंडला खेळणे, जोगवा मागणे, जागरण गोंधळ घालून देवीची उपासना करणे यावर भर दिला जातो. आश्विन महिन्यात जेव्हा हस्त नक्षत्राला सुरुवात होते, तेव्हा पुढे सोळा दिवस किंवा नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून ते पौर्णिमेपर्यंत महाराष्ट्रात भोंडला खेळला जातो. पाटावर हत्तीचे चित्र काढून त्याला सजवून माळ घालून त्याच्याभोवती भोंडल्याची गाणी म्हणत फेर धरला जातो. हत्ती हे जसं समृद्धीचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे ते मेघांचं प्रतीक आहे. त्याला
जलत्त्वाचे प्रतिक प्रतिनिधी मानून त्याची भोंडल्यात पूजा करतात. पाऊस पडून गेलेला असतो, त्यामुळे धरणी सुजलाम सुफलाम झालेली असते. भोंडल्यामधील हत्ती म्हणजे मेघ, तर लक्ष्मी, गौरी म्हणजे धरणी मातेचे प्रतीक असे समजून त्यांची पूजा केली जाते. तसं पाहिलं तर पाऊस पडावा म्हणून आपण पूजा करतोच, त्याचप्रमाणे ही प्रतीकात्मक पूजा आहे. दरवर्षी हत्ती बुडेल एवढं पाणी बरसावं हीच त्यामागची समजूत आहे. तर जोगवा मागणे म्हणजे देवीसाठी भिक्षा मागणे. जोगवा ही देवीच्या उपासनेतील एक संकल्पना आहे. देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये नवरात्रात जागरण-गोंधळ घालण्याची जुनी प्रथा आहे. जोगवा, गोंधळ व भोंडला हे महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीचे अविभाज्य भाग आहेत.

ऐतिहासिक दसरा

ऐतिहासिक पाऊलखुणांवरून वाटचाल करणार्‍या शाही दसर्‍याचे महत्त्व, तेज अद्यापही कायम आहे. या दसर्‍याच्या परंपरेलाही एक भव्य इतिहास आहे. भारतामध्ये दसर्‍याचे स्वरूप हे शाही आहे. कर्नाटकातील ‘म्हैसूर’ राज्यातील दसरा ‘नाडहब्ब’ या नावाने ओळखला जातो. पिढ्यानपिढ्या हा उत्सव राजेशाही इतमामाने साजरा केला जातो. कोल्हापुरातील दसराही असाच खास असतो. ४० कोटींच्या मेबॅक मोटारीमधून कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे आगमन होते. सायंकाळी पाचच्या दरम्यान श्री महालक्ष्मी, तुळजाभवानी व गुरुमहाराज पालखी लवाजम्यासह दसरा चौकात वाद्याच्या गजरात पोहोचतात. निमंत्रितांसह मानकरी व नागरिकांना बसण्यासाठी आलिशान शामियाना उभारला जातो. छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते चौकातील शमीच्या पानांचे पूजन होते. त्यानंतर सोने लुटण्याचा थरार कोल्हापुरातील दसरा चौक अनुभवतो. वीररसाचे प्रतीक म्हणून जपलेला जेजुरीचा ‘मर्दानी दसरा’ आज आधुनिक युगातही त्याच्या खंडा उचलणे, आतषबाजी, पालखी सोहळा आदी परंपरांमुळे अद्याप जिवंत आहे. जेजुरी गडावर असणारा हा खंडा पेशवाईच्या काळात सोनोरीचे सरदार रामराव व महिपतराव पानसे यांनी खंडोबाला अर्पण केला. हा खंडा एका हातात जास्त वेळ उचलून धरण्याची व कसरती करण्याची स्पर्धा दसर्‍याला होते. या दसरा उत्सवासाठी अनेक परदेशी पाहुणेही येतात. काही स्पर्धक वीस ते पंचवीस मिनिटांपर्यंतही खंडा उचलून धरतात. तर दाताने तलवार उचलणे, एका हाताने युद्धासारखी फिरवणे, दातात धरून उठाबशा काढणे आदी चित्तथरारक कसरती पाहायला मिळतात. मैसूरच्या दसर्‍यानंतर कर्नाटकातील दुसरा सर्वात मोठा दसरा म्हणून बेळगावच्या दसर्‍याकडे पाहिले जाते. यात महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन्ही राज्यांच्या सांस्कृतिक छटा पाहायला मिळतात. विजयनगर साम्राज्यापासून सुरू झालेली ही परंपरा नंतरच्या काळातही तितक्याच उत्साहाने जपली गेली. जुन्या काळातील पाच वेगवेगळ्या संस्थानांचे देव एकत्र येऊन इथे सीमोल्लंघन होते.
viva@expressindia.com