पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगित-बाल्टिस्तान प्रांतात पाकिस्तान आणि चीनचा ऑप्टिकल फायबर प्रकल्प होणार असून त्याचे भूमिपूजन गुरुवारी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केले. या ४४ दशलक्ष डॉलरच्या प्रकल्पामुळे दोन्ही देशांमध्ये पर्यायी दळणवळणाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
सदर प्रकल्प हा पाकिस्तान आणि चीनमधील ४६ अब्ज डॉलरच्या आर्थिक मार्गिका प्रकल्पाचा एक भाग असून तो पाकव्याप्त काश्मीरमधून जाणार आहे. त्यामुळे चीनचा पश्चिम भाग आणि पाकिस्तानातील गदर बंदर जोडले जाणार आहे. रस्ते, रेल्वे आणि दळणवळणाचे अन्य मार्ग यांचे जाळे उभारण्यात येणार आहे.
ऑप्टिकल फायबर प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण केला जाणार असून विशेष दळणवळण संघटना ८२० कि.मी. लांबीची केबल रावळिपडी ते खुंजरब यादरम्यान टाकणार आहे, असे वृत्त पाकिस्तान नभोवाणीने दिले आहे.