वॉशिंग्टन येथील आण्विक परिषदेचे निमित्त
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पुढील महिन्यात आयोजित केलेल्या आण्विक परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट होऊ शकते, असे वृत्त एका दैनिकाने प्रकाशित केले आहे.
वॉशिंग्टन येथे ३१ मार्च व १ एप्रिल रोजी होणाऱ्या आण्विक परिषदेसाठी ओबामा यांचे निमंत्रण मोदी व शरीफ या दोघांनीही स्वीकारले असल्याचे ‘डॉन’ वृत्तपत्राने म्हटले आहे. ओबामा यांनी २०१० साली सुरू केलेल्या आण्विक सुरक्षा परिषदेत दोन्ही देशांचे पंतप्रधान सहभागी होण्याची ही पहिली वेळ असेल.
या परिषदेनिमित्त दोन्ही नेत्यांची भेट होण्याची अतिशय दाट शक्यता आहे. पण भारत-पाकिस्तान बोलण्यांचा इतिहास तुम्हाला माहीत आहे. एखादा कार्यक्रम होईपर्यंत तुम्ही त्याबद्दल निश्चितपणे सांगू शकत नाही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
दहशतवाद्यांना अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखणे हा या परिषदेचा प्रमुख उद्देश असून तो साध्य करण्याच्या दृष्टीने विविध प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी जगातील नेते यावेळी एकत्र येतात. बराक ओबामा यांच्या कार्यकाळाचे हे शेवटचे वर्ष असल्यामुळे चौथ्या परिषदेतून काहीतरी ठोस निष्पन्न साध्य करण्यासाठी त्यांचे प्रशासन निकराचे प्रयत्न करत आहे.