पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीविरुद्ध निवडणूक लढण्यासाठी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी १९९० मध्ये अल-कायदाचा तत्कालीन म्होरक्या ओसामा बिन लादेन याच्याकडून पैसे घेतले होते, असा दावा एका नव्या पुस्तकाद्वारे करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. ‘खलिद ख्वाजा : शाहीद-ए-अमन’ असे या पुस्तकाचे नाव असून शमामा खलिद या पुस्तकाच्या लेखिका आहेत. त्या वेळी आयएसआयमध्ये सक्रिय असलेले खलिद ख्वाजा यांच्या शमामा या पत्नी आहेत. इस्लामी पद्धती सुरू करण्याचा निर्धार शरीफ यांनी व्यक्त केला होता त्याकडे ख्वाजा आणि ओसामा बिन लादेन आकर्षित झाले होते, असा दावा पुस्तकात केला आहे.