नक्षलवाद्यांकडून वाहन स्फोट : एक ठार, ११ जण जखमी

वाहनातील एका महिलेसह सर्व १२ प्रवासी जखमी झाले

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी गुरुवारी एक एसयूव्ही वाहन स्फोटात उडवून दिल्याच्या घटनेत एक जण ठार, तर ११ जण जखमी झाले.

ही घटना सकाळी साडेसातच्या सुमारास मालेवाढी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोटिया खेड्यानजीक नारायणपूर- दंतेवाडा मार्गावरील एका बांधकाम सुरू असलेल्या रस्त्यावर घडली. नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याची योजना आखली असावी, मात्र चुकीने त्यांनी नागरिकांच्या वाहनावर हल्ला केला. या मार्गावरून जाताना पोलीस कधीही चारचाकी वाहन वापरत नाहीत, असे पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी सांगितले.

बोलेरो वाहन या रस्त्यावरून जात असताना आयईडीचा स्फोट झाला. यामुळे वाहनातील एका महिलेसह सर्व १२ प्रवासी जखमी झाले. यापैकी दोघे गंभीर जखमी झाले, तर इतर १० जणांना किरकोळ जखमा झाल्या.

या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर नजीकच्या तळावरून सुरक्षा दलांचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले आणि त्यांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवले. गंभीर जखमींपैकी मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील धन सिंह हा उपचारादरम्यान मरण पावला.

हल्ल्याचे बळी ठरलेले लोक छत्तीसगडच्या राजनांदगाव आणि मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी होते व ते शेजारच्या तेलंगणा राज्यात जात होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Naxal blast kills one injures 11 akp

ताज्या बातम्या