गडचिरोली : नक्षलवादाच्या विरोधात सुरक्षा दलांनी पुकारलेल्या निर्णायक लढ्याची मुदत संपल्यानंतर प्रथमच सोमवारी पहाटे महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती भागातील माचपल्लीच्या घनदाट जंगलात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत जहाल नक्षलवादी रंगाबोईना भाग्या ऊर्फ रुपी रेड्डी (४५) ठार झाली. पाच लाख रुपयांचे बक्षीस तिच्यावर होते. ती ठार झाल्याने उत्तर बस्तरमधील नक्षली चळवळीला मोठा हादरा बसला.
छत्तीसगड जिल्ह्यातील कांकेर जिल्ह्यातील छोटेबेठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्याच्या आधारे जिल्हा पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलाच्या संयुक्त तुकडीने रविवारी रात्रीपासूनच या भागात नक्षलविरोधी अभियान तीव्र केले होते. सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास माचपल्लीच्या जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांशी पोलिसांची चकमक उडाली. अनेक नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत पसार झाले.
सकाळी परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली, तेव्हा एका महिला नक्षलवाद्याचा मृतदेह आणि जवळच एक अत्याधुनिक स्वयंचलित रायफल आढळून आली. तपासणीअंती ही मृत नक्षली जहाल नेत्या रुपी रेड्डी असल्याचे निष्पन्न झाले.
तेलंगण कॅडरचा छत्तीसगडमधील शेवटचा दुवा
मूळची तेलंगण राज्यातील रहिवासी रुपी रेड्डी ही २००४ पासून नक्षल चळवळीत सक्रिय होती. ती माड डिव्हिजनची विभागीय समिती सदस्य आणि परतापूर क्षेत्रीय समितीची महत्त्वाची सूत्रधार होती. छत्तीसगड राज्यातील जहाल नक्षलवादी सुगुलुरी चिन्नाना ऊर्फ विजय रेड्डी याची ती पत्नी होती. विजय रेड्डी १३ ऑगस्ट २०२५ रोजी मोहल्ला-मानपूर चकमकीत ठार झाला. पतीच्या मृत्यूनंतरही रुपीने शस्त्र खाली न ठेवता चळवळ सुरूच ठेवली होती.
