ओरिसातील कोरापूत जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या तुकडीवर मंगळवारी सकाळी हल्ला केला. यामध्ये सीमा सुरक्षा दलाचे चार जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची गाडीच पेटवून दिल्यामुळे हे जवान भाजून मृत्युमुखी पडले. या हल्ल्यामध्ये दोन जवान जखमी झाले आहेत.
सीमा सुरक्षा दलाचे १८ जवान घेऊन तीन गाड्या कोरापूत जिल्ह्यातील पतंगीतून सुंकीकडे निघाल्या होत्या. त्याचवेळी मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास नक्षलवाद्यांनी या गाड्यांवर हल्ला चढवला. नक्षलवाद्यांनी या गाड्यांच्या मार्गामध्ये स्फोटके पेरून ठेवली होती. पहिली गाडी तेथून जात असताना स्फोट झाल्यामुळे तिला आग लागली. याच आगीमध्ये चार जवान भाजून शहीद झाले. या घटनेनंतर मागील दोन गाड्यांमधील जवानांनी नक्षलवाद्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. त्यामुळे घटनास्थळी गोळीबाराच्या फैरी झडल्या. हल्ल्यातील जखमी जवानांना सुंकीमधील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर राज्यातील पोलिसांचे पथक आणि निमलष्करी दलांचे पथक कोरापूतमधील घटनास्थळाकडे पाठविण्यात आले आहे.