नक्षलवादी ही आपलीच माणसे आहेत़  त्यामुळे त्यांच्याविरोधातील कारवाईत अधिक मानवतापूर्ण दृष्टिकोन असायला हवा, असे मत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) नवनियुक्त महासंचालक दिलीप त्रिवेदी यांनी मंगळवारी येथे व्यक्त केल़े
सीआरपीएफ हे नक्षलवादविरोधी कारवायांची प्रमुख यंत्रणा आह़े  या दलाचे ८५ हजार जवान देशातील नऊ नक्षलप्रभावित राज्यांमध्ये कार्यरत आहेत़  नक्षलवाद्यांशी लढताना आपण देशाबाहेरच्या शत्रूशी लढत नाही़  तर देशांतर्गतच कारवाई करीत आहोत़  हे लक्षात ठेवून आपल्या कारवाईबाबत आपण चोखंदळ असले पाहिजे, असेही त्रिवेदी म्हणाल़े महिन्याभरापूर्वीच पदभार स्वीकारलेल्या त्रिवेदी यांनी नुकताच नक्षलप्रभावित झारखंड आणि छत्तीसगडचा दौरा केला़  त्यानंतर ते बोलत होत़े  आपण देशांतर्गत लढत आहोत़  त्यामुळे दृष्टिकोन थोडासा मानवतावादी असावा परंतु, त्यामुळे आपण लढण्याच्या सिद्धतेत कमी पडावे, असे मात्र नाही, असेही त्रिवेदी यांनी या वेळी स्पष्ट केल़े नक्षलवाद संपविण्यास काही काळ लागेल़  मात्र ते उद्दिष्ट निश्चितच साध्य होईल आणि प्रभावित भागांत विकासही घडून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़  बुधवारी नक्षल प्रभावित राज्यांतील मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांची नवी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आह़े