नक्षलवादी उद्योगपती, व्यापारी व कंत्राटदार यांच्याकडून दरवर्षी १४० कोटी रुपये खंडणी गोळा करतात, असे सरकारने लोकसभेत सांगितले.
डावे अतिरेकी गट नक्षलवादी चळवळीचे प्राबल्य असलेल्या विशेष करून भाकप (माओवादी) हे खाणकाम व तेंदूपत्ता उद्योगातील व्यापारी, उद्योगपती व व्यापारी यांच्याकडून ही खंडणी गोळा करतात.
इन्स्टिटय़ूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अॅनॅलिसिस या संस्थेने केलेल्या पाहणीनुसार भाकप माओवादी पक्षाने वर्षांला १४० कोटींपेक्षा जास्त खंडणी विविध स्रोतांकडून गोळा केली आहे, असे गृह राज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी  सांगितले.
५९७ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या
गेल्या पाच वर्षांत तीनही संरक्षण दलांतील तब्बल ५९७ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, अशी माहिती संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली. याच काळात लष्करातील १,३४९ अधिकारी सेवा सोडून गेले, अशी माहितीही त्यांनी दिली.
लष्करातील ४९८, हवाई दलातील ८३ आणि नौदलातील १६ कर्मचाऱ्यांनी २००९ ते २०१३ या काळात आत्महत्या केली आहे. २०१०मध्ये लष्करातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबला. या वर्षी तब्बल ११६ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. लष्करातील १,३४९ अधिकाऱ्यांनी गेल्या पाच वर्षांत स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.
दत्तक प्रक्रियेतील नियमांमध्ये बदल
मुले दत्तक घेताना अनेकदा या प्रक्रियेमध्ये विलंब होतो. त्यात वेळ आणि पैसाही खर्च होतो. त्यामुळे दत्तक प्रक्रियेतील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे, असे महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी सांगितले.
पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा
२०१३-१४ मध्ये ३,७५३ पाकिस्तानी नागरिकांना दीर्घकालीन व्हिसा देण्यात आलेला आहे, असे सरकारने संसदेत सांगितले. गेल्या चार वर्षांत १,८५४ परदेशींना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. पाकिस्तानात अल्पसंख्याक असलेले काही हिंदू वैध व्हिसाच्या आधारे भारतात आले. मात्र धार्मिक छळ होत असल्याने ते परत पाकिस्तानात गेलेले नाहीत. त्यांनी दीर्घकालीन व्हिसाची मागणी केल्याने त्यांना हा व्हिसा देण्यात आलेला आहे,