काँग्रेसच्या नेत्यांच्या शनिवारी झालेल्या  हत्याकांडाप्रकरणीमाओवादी कम्युनिस्ट पक्षाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून आपल्या संघटनेविरोधात देशभरात सुरू असलेल्या कारवाया तातडीने स्थगित कराव्यात, अशी मागणी या संघटनेने केली आहे. माओवादी कम्युनिस्ट पक्षावर सध्या बंदी घालण्यात आली आहे. नंदकुमार पटेल आणि महेन्द्र कर्मा यांच्यासह काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी लोकविरोधात धोरणे राबविल्यामुळेच त्यांना ‘शासन’ करण्याचा मुख्य हेतू होता, असे सांगून काँग्रेसच्या यात्रेवरील हल्ल्याचे या संघटनेने समर्थन केले आहे.
‘सलवा जुडम’ या नक्षलवाद्यांविरोधातील मोहिमेतून निरपराध लोक, आदिवासी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना अटकाव करण्याचा आमचा हेतू होता, असे नक्षलवाद्यांनी स्पष्ट केले. नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य विशेष विभागीय समितीचे प्रवक्ते गुडसा उसेंडी यांनी प्रसारमाध्यमांसाठी एक निवेदन पत्राद्वारे जारी केले असून त्यामध्ये उपरोक्त बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. लोकविरोधी धोरणांना काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष सारखेच जबाबदार आहेत आणि म्हणूनच ज्येष्ठ नेत्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. कर्मा, पटेल  आणि अन्य नेते आपले ‘मुख्य लक्ष्य’ आहेत, याचाही या निवेदनात विशेष उल्लेख करण्यात आला आहे.
नंदकुमार पटेल हे राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी बस्तर जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी निमलष्करी तुकडय़ा पाठविल्या होत्या. केंद्र सरकारमध्ये दीर्घकाळ काम करणारे विद्याचरण शुक्ला हेही सामान्य माणसाचे शत्रू असून मंत्रिपदाच्या कारकिर्दीत राज्यात उद्योगपतींना अनुकूल ठरतील, अशी अनेक धोरणे राबविण्यात ते अत्यंत सक्रिय होते, असे संबंधित पत्रामध्ये म्हटले आहे. ‘सलवा जुडम’ मोहिमेत शेकडो आदिवासी महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आले, तसेच अनेक निरपराध लोकांना ठार मारण्यात आले, असाही आरोप या पत्रात करण्यात आला असून या हल्ल्यांद्वारे आम्ही या सर्व कृत्यांचा सूड घेतला, असे त्यामध्ये म्हटले आहे. काँग्रेसच्या कनिष्ठ नेत्यांसह काही निरपराध लोक ठार झाल्याबद्दल या पत्रात खेद व्यक्त करण्यात आला असून, दंडकारण्यातून निमलष्करी दले मागे घेण्यात यावी तसेच निरपराध आदिवासींना तुरुंगांमधून मुक्त करावे, अशा मागण्या नक्षलवाद्यांनी केल्या आहेत.