छत्तीसगडमधील गरियाबंद जिल्हय़ात माओवाद्यांनी जंगलात टाकून दिलेली शस्त्रे व दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर छत्तीसगड व ओदिशाचे संयुक्त पोलीस पथक मैनपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नगरार खेडय़ात गेले व तेथे पर्वतीय भागातील जंगलातून शस्त्रसाठा व दारूगोळा जप्त केला, असे पोलीस महानिरीक्षक जी. पी. सिंह यांनी सांगितले.
दोन ३०३ बोअर रायफली, मझल लोडिंग गन, देशी पिस्तूल, १६ डिटोनेटर, वॉकीटॉकी, जिलेटिन कांडय़ा, दोन रिमोट, १२ बोअर बंदुकीची जिवंत काडतुसे व चार टिफीन बॉम्ब या वेळी जप्त करण्यात आले. छत्तीसगड-ओदिशा मार्गावर नक्षलवाद्यांनी शस्त्रे लपवली असल्याचे समजताच ओदिशा व छत्तीसगडच्या केंद्रीय राखीव पोलीस दल तसेच विशेष मोहिमा दलांनी १५० किमी भागात शोधमोहीम राबवली. प्राथमिक माहितीनुसार पावसाळय़ाआधी शस्त्रे व दारूगोळा निकामी होऊ नये म्हणून ती सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली होती. या शस्त्र जप्तीमुळे माओवाद्यांचा संभाव्य मोठा हल्ला टळला आहे. आगामी काळात अशा आंतरराज्य मोहिमा मोठय़ा प्रमाणावर हाती घेतल्या जातील असे त्यांनी सांगितले.
नक्षलवाद विरोधी मोहिमेला अभूतपुर्व यश मिळाले असून ४६ लाखाचे ईनाम असलेल्या नऊ नक्षलवाद्यांनी रविवारी महाराष्ट्र आणि गडचिरोली जिल्ह्य़ातील अधिकाऱ्यांसमोर सर्मपण केल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे.
या बंडखोरांमध्ये विभागीय कमिटीचा सदस्य सुनिल माथ्थामीच समावेश असून त्यांच्यावर १६ लाखांचे ईनाम ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर दोन विभाग कंमाडर आणि तीन महिला नक्षलवाद्यांनी देखील सर्मपण केले आहे.