Petrol-Diesel Rate Cut : अमेरिका आणि इराण युद्धामुळे मागील काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकले होते. त्यामुळे त्याचा फटका भारतालाही बसला होता. पश्चिम आशियातील संघर्षामुळे इंधनाचा पुरवठा विस्कळीत होत असल्याचं पाहायला मिळालं होतं. पण आता पश्चिम आशियातील परिस्थिती हळूहळू सुरळीत होत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत काहीसी घसरण झाली आहे.
त्या पार्श्वभूमीवर भारतातील खासगी इंधन विक्रेता कंपनी ‘नायरा एनर्जी’ने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. खाजगी इंधन विक्रेता कंपनी नायरा एनर्जीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ५ रपये आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नायरा एनर्जीनेने १ जुलैपासून जवळपास ७ हजार पेट्रोल पंपांवर नवीन दर लागू केले आहेत. या संदर्भातील वृत्त पीटीआयने दिलं.
इतर कंपन्यांचे पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर
खासगी इंधन विक्रेता कंपनी नायरा एनर्जीने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला असला तरी इतर तेल कंपन्यांनी म्हणजेच आयओसी (IOC), एचपीसीएल (HPCL) आणि बीपीसीएल (BPCL) या कंपन्यांनी सध्या तरी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात केलेली नाही. या कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या प्रत्यक्ष किरकोळ किमतीमध्ये वेगवेगळ्या राज्यातं तफावत असू शकते. कारण त्यावर पेट्रोल आणि डिझेलवर आकारले जाणारे व्हॅट आणि इतर स्थानिक कर हे वेगवेगळ्या राज्यांनुसार वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्यक्ष किरकोळ किमतींमध्ये विविध राज्यांमध्ये दर वेगवेगळे असतात.
दरम्यान, नायरा एनर्जीने ही भारतातील सर्वात मोठी खासगी इंधन किरकोळ विक्रेता कंपनी असून मागच्या दोन दोन वर्षांच्या कालावधीत कोणत्याही कंपनीने इंधनाच्या किरकोळ दरात केलेली ही पहिलीच कपात आहे. पश्चिम आशियातील तणाव निवळल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली घसरण पाहता नायरा एनर्जीने हा निर्णय घेण्यात स्पष्ट करण्यात आलं आहे.
