‘एनबीसी न्यूज’मध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध पत्रकार मॅट लावरवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे मॅट यांची कामावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. रिओ ऑलिम्पिक खेळांच्यावेळी मॅटने आपले लैंगिक शोषण केल्याचा दावा संबंधित महिलेने केला.

वाचा : ‘लैंगिक शोषण फक्त सिनेसृष्टीतच नाही, तर घरोघरी होते’

महिलेने लावलेल्या आरोपांची दखल घेत ‘एनबीसी न्यूज’मधील पदाधिकाऱ्यांनी तातडीने त्याला पदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला. कामाच्याच ठिकाणी मॅटचे इतर महिलांशीही प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा आहेत. मॅटवर ही कारवाई केली गेल्यामुळे सध्या आंतराष्ट्रीय टेलिव्हिजन विश्वात एकच खळबळ माजली आहे. मॅटच्या या वागण्याविषयी माध्यमांमध्ये बऱ्याच चर्चा सुरु असून वाहिनीच्या प्रतिष्ठेचा विचार करत संबंधित पदाधिकाऱ्यांनी त्याच्यावर ही कारवाई केली.

‘एनबीसी न्यूज’वर प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या ‘टुडे’ या कार्यक्रमामुळे मॅट नावारुपास आला होता. अमेरिकन टेलिव्हिजन विश्वात या कार्यक्रमाची बरीच चर्चा असते. पण, त्यातून आणि वाहिनीतूनच मॅटची अशा पद्धतीने हकालपट्टी केल्यामुळे प्रेक्षकांसाठी हा मोठा धक्का होता. पण, त्याच्या सहकाऱ्यांसाठी ही बाब अपेक्षित होती. कारण, बऱ्याच वाहिन्यांच्या प्रसिनिधींनी मॅटवर नजर ठेवली होती.