scorecardresearch

“क्रूझवरील छोटे मासे पकडण्यात व्यस्त असणारी NCB अदानींच्या बंदरावर सापडलेल्या ३००० किलो हिरॉईनसंदर्भात मात्र…”; काँग्रेसचा टोला

कोर्डेलिया क्रूझवर केलेल्या छापेमारी प्रकरणानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना एनसीबीवर निशाणा साधलाय.

Congress Leader Tweet
रविवारी एनसीबीने केलेल्या कारवाईनंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांचं वक्तव्य (प्रातिनिधिक फोटो)

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) कोर्डेलिया क्रूझवर केलेल्या छापेमारी प्रकरणासंदर्भात बोलताना काँग्रेसने काही गंभीर आरोप केले आहेत. क्रूझवर सापडलेले अमली पदार्थ आणि अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला झालेली अटक या प्रकरणावर भाष्य करताना काँग्रेसचे नेत्या आणि राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी एनसीबीचे अधिकारी या क्रूझ प्रकरणातील कारवाईच्या माध्यमातून छोट्या माश्यांच्या मागे लागले आहेत. मात्र त्याचवेळी गुजरातमधील मुंद्रा बंदरावर सापडलेल्या तीन हजार किलो हेरॉईनसंदर्भात ही केंद्रीय संस्था शांत आहे, अशी टीका केलीय.

“क्रूझवरील छोट्या माशांना पडकडण्यासाठी एनबीसी फार व्यस्त आहे. पण जेव्हा मोठ्या माशांची गोष्ट येते तेव्हा अदानींच्या मुंद्रा बंदरावरुन करण्यात आलेल्या तीन हजार किलो हेरॉईनसंदर्भात एनबीसी एकदम शांत आहे. एनसीबी असा राजाश्रय (किंगपिन्स) असणाऱ्यांच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या अमली पदार्थांच्या पुरवठ्याला संरक्षण का देत आहे आणि कोणाच्या आदेशानुसार देत आहे?,” असं शमा यांनी म्हटलं आहे.

क्रूझवर काय काय सापडलं?
आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर ‘एनसीबी’ने शनिवारी ही कारवाई केली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी, २ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला. त्यात पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त करण्यात आले आहेत. सशयितांच्या रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

गुन्हा दाखल
‘एनसीबी’ने आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दिवसभर नवी मुंबईसह आणखी काही ठिकाणी शोधमोहीम राबवून संशयित अमली पदार्थ विक्रेत्यांची चौकशी करण्यात आली आणि एकाला ताब्यात घेण्यात आले. रविवारी सकाळी ताब्यात घेण्यात आलेल्या आठ जणांना ‘एनसीबी’च्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील कार्यालयात आणले आणि त्यांना अटक करण्यात आली. आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपींमध्ये कोणाचा समावेश?:
आर्यन खानसह, मूनमून धमेचा, नूपुर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाज र्मचट यांना अटक करण्यात आली आहे.

मुंद्रा बंदरावर नक्की काय घडलं?
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात मुंद्रा बंदरावर १६ सप्टेंबर रोजी महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या छापेमारीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले. दोन वेगवेगळ्या कंटेनरमध्ये प्रक्रिया केलेल्या टाल्क स्टोनच्या आवरणाखाली तब्बल २,९८८.२१९ किलोग्रॅम हेरॉईन ड्रग्ज सापडलं. अमली पदार्थांची तस्करी करणारी ही जहाजं अफगाणिस्तानमधून इराणमार्गे भारतात पाठवण्यात आली होती. यानंतर गुजरातमध्ये ठिकाठिकाणी छापेमारी करत कारवाई सुरू आहे.

अदानी समुहाने दिलेलं स्पष्टीकरण
अदानी उद्योग समुहाची मालकी असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठा सापडल्यानं खळबळ उडाल्यानंतर अदानी समुहाने स्पष्टीकरण दिलं होतं. “बंदर चालवणाऱ्या कंपनीची भूमिका केवळ बंदरावरील वाहतुकीचं नियोजन करण्याची आहे. आम्ही केवळ जहाजांना बंदरावरील सेवा देतो. मुंद्रा बंदरावरुन वाहतूक होणाऱ्या कंटेनर आणि कार्गो जहाजांची तपासणी करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत.”

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncb busy arresting small fish congress shama mohamed reacts to mumbai cruise raid alleges agency mum over massive drug haul at adani port scsg