Captagon Jihadi Drug Seized NCB Operation Ragepill:देशाला ड्रग्जमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने अमली पदार्थ माफियांविरोधात मोठी मोहीम सुरु केली आहे. अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (NCB) ‘ऑपरेशन रेजपिल’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत भारतात पहिल्यांदाच तब्बल १८२ कोटी रुपयांचे ‘कॅप्टागॉन’ (Captagon) हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या ड्रग्जला जगभरात ‘जिहादी ड्रग’ म्हणून ओळखले जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत या कारवाईची माहिती दिली आहे.
मध्य पूर्वेतील देशांमध्ये तस्करीचा डाव उधळला
माहितीनुसार, जप्त करण्यात आलेला ड्रग्जचा हा मोठा साठा मध्य पूर्वेतील देशांमध्ये पाठवला जाणार होता. मात्र, भारतीय यंत्रणांनी सतर्कता दाखवत हा डाव हाणून पाडला. याप्रकरणी एका विदेशी नागरिकाला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी एनसीबीच्या कामगिरीचे कौतुक करताना म्हटले की,”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार भारताला ड्रग्जमुक्त करण्यासाठी कटिबद्ध आहे. भारताच्या भूमीचा वापर करून होणारी ड्रग्जची आंतरराष्ट्रीय तस्करी रोखण्यासाठी एनसीबी कटिबद्ध असून, देशात येणाऱ्या किंवा इथून बाहेर जाणाऱ्या ड्रग्जच्या प्रत्येक ग्रॅमवर आमची नजर असेल.”
‘जिहादी ड्रग’नक्की काय आहे हे?
‘कॅप्टागॉन’ हे मूळचे ‘फेनेटिलाइन’ या सिंथेटिक उत्तेजकाचे ब्रँड नाव आहे. १९६० च्या दशकात एकाग्रतेचा अभाव , नैराश्य आणि अतिझोप येणे यांसारख्या आजारांवरील उपचारांसाठी हे औषध विकसित करण्यात आले होते. मात्र, या औषधामुळे अंमली पदार्थांचे व्यसन जडत असल्याचे समोर आल्यानंतर, १९८० च्या दशकात यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी घालण्यात आली. संयुक्त राष्ट्राने (UN) याला प्रतिबंधित अमली पदार्थांच्या यादीत टाकले आहे.
‘जिहादी ड्रग’ हे नाव कसे पडले?
पश्चिम आशियातील देशांमध्ये, विशेषतः सीरियातील यादवी युद्धादरम्यान या ड्रग्जचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाला. ‘इिसस’ (ISIS) सारख्या दहशतवादी संघटनांमधील दहशतवादी भीती दूर करण्यासाठी, अंगातील ताकद आणि ऊर्जा वाढवण्यासाठी तसेच सलग अनेक तास जागे राहण्यासाठी या गोळ्यांचे सेवन करायचे. दहशतवाद्यांकडून याचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्यामुळेच याला जगभरात ‘जिहादी ड्रग’ असे नाव पडले.
बनावट गोळ्यांचा सुळसुळाट आणि काळा बाजार
सध्या बाजारात मिळणाऱ्या कॅप्टागॉन गोळ्या या बेकायदेशीरपणे आणि छुप्या प्रयोगशाळांमध्ये तयार केल्या जातात. अनेकदा यात मूळ ‘फेनेटिलाइन’ ऐवजी कॅफिन आणि ॲम्फेटामाइन यांसारख्या इतर घातक रसायनांचा वापर केला जातो. हे ड्रग्ज अत्यंत व्यसनधिन करणारे असून, युद्धग्रस्त आणि अशांत भागातील दहशतवादी संघटनांना पैसा पुरवण्याचा हा एक मोठा स्रोत बनला आहे.
भारतात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅप्टागॉन जप्त झाल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, या रॅकेटची पाळेमुळे शोधण्याचे मोठे आव्हान आता एनसीबीसमोर असणार आहे.
