एनसीईआरटीच्या समाजशास्त्र पाठ्यपुस्तकात बदल काँग्रेसच्या फाळणीबाबत भूमिकेवर प्रश्नचिन्ह; हिटलरचे संदर्भ हटवले पीटीआय, नवी दिल्ली न्यायव्यवस्थेची कथित बदनामी केल्याच्या वादामुळे सुधारित करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) इयत्ता आठवीच्या समाजशास्त्र पाठ्यपुस्तकात आणखी काही बदल करण्यात आले आहेत. यात १९४७ मधील फाळणीबाबत काँग्रेसच्या भूमिकेत बदल करून ‘फाळणीचा स्वीकार हाच एकमेव मार्ग होता का’ हा अजूनही वादाचा विषय असल्याचे म्हटले आहे.

या नवीन पाठ्यपुस्तकात वि. दा. सावरकर यांच्या ‘स्वराज्य’च्या मागणीचा समावेश करण्यात आला आहे, तर ॲडॉल्फ हिटलर आणि नाझी विचारसरणीचे संदर्भ मात्र वगळण्यात आले आहेत. न्यायव्यवस्थेची बदनामी केल्याच्या आरोपामुळे काही महिन्यांपूर्वी वाद निर्माण झाल्यानंतर, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने या आठवड्यात इयत्ता आठवीचे सुधारित समाजशास्त्र पाठ्यपुस्तक ‘एक्स्प्लोरिंग सोसायटी – इंडिया अँड बियाँड’ वादग्रस्त भाग वगळून प्रसिद्ध केले आहे.

न्यायालयीन खटल्यांचे प्रलंबित असणे आणि न्यायालयाच्या दोन महत्त्वांच्या निकालांचे संदर्भ यांसारखे वादग्रस्त भाग वगळण्यात आले आहेत, तर सुधारित पाठ्यपुस्तकात जनहित याचिका, न्यायाधिकरण आणि पर्यायी विवाद निवारण यंत्रणांविषयी नवीन माहिती जोडण्यात आली आहे.

आर्थिक पार्श्वभूमीचा समावेश

‘एनसीईआरटी’च्या इयत्ता ८ वीच्या सामाजिक शास्त्राच्या सुधारित पाठ्यपुस्तकात जात, धर्म, वंश, लिंग आणि अपंगत्व या पूर्वीच्या घटकांबरोबरच आता आर्थिक पार्श्वभूमीचाही भेदभावाच्या कारणांमध्ये समावेश केला आहे. यूजीसीच्या २०२६ च्या नियमावलीत आर्थिक पार्श्वभूमीचा स्पष्ट उल्लेख नसताना, एनसीईआरटीने नव्या पुस्तकात हा बदल केला आहे. सुधारित पाठ्यपुस्तकातील ‘नागरिकत्व – हक्क आणि कर्तव्ये’ या प्रकरणात, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना भेदभाव आणि असमान वागणुकीचा सामना करावा लागू शकतो, असे नमूद केले आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीशी तिच्या आर्थिक पार्श्वभूमीवरून किंवा शारीरिक स्वरूपावरून भेदभाव करणे हे अनैतिक आणि कायद्याने प्रतिबंधित असल्याचे म्हटले आहे.

ऑगस्टपर्यंत सर्व पाठ्यपुस्तके नवीन

नवीन अभ्यासक्रमानुसार तयार केलेली इयत्ता पहिली ते नववीची दोन पुस्तके वगळता इतर सर्व पाठ्यपुस्तके आता उपलब्ध झाली आहेत, अशी माहिती राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) अधिकाऱ्यांनी दिली आहे. उर्वरित दोन प्रलंबित पुस्तके पुढील महिन्यापर्यंत म्हणजेच ऑगस्टपर्यंत प्रसिद्ध केली जातील. इयत्ता नववीच्या सामाजिक शास्त्र आणि गणित या विषयांची ‘भाग २’ ची पुस्तके ऑगस्टपर्यंत येणे अपेक्षित आहे. चालू शैक्षणिक सत्र सुरू होऊन तीन महिने झाले तरी सर्व पाठ्यपुस्तके उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर अधिकाऱ्यांकडून हे स्पष्टीकरण आले आहे.