NCERT Class 9 Arts textbook Dancing Girl image restored : इयत्ता नववीच्या कला शिक्षण (Arts Education) या नवीन पाठ्यपुस्तकात मोहेंजोदारो येथील ऐतिहासिक डान्सिंग गर्ल (नर्तकी) ची मूळ मूर्ती झाकली गेल्याचे वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने प्रसिद्ध केल्यानंतर, ‘नॅशनल कॉन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’ने (NCERT) हडप्पा संस्कृतीतील या कांस्यमूर्तीचे मूळ चित्र पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मूळ मूर्ती नग्न असल्याने त्यावर वाद निर्माण होऊ शकतो, असा दावा करण्यात आला होता.
छापील पुस्तकात पुढच्या वर्षीपासून बदल
एनसीईआरटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या पाठ्यपुस्तकाच्या डिजिटल आवृत्तीत हे बदल तातडीने केले जातील, अशी माहिती मिळाली आहे. तर, अद्याप छपाई न झालेल्या पुस्तकांच्या प्रतींमध्येही हे सुधारित चित्र समाविष्ट केले जाईल. “पुढील वर्षापासून हे बदल छापील पुस्तकांमध्येही (हार्ड कॉपी) दिसून येतील,” असे एका सूत्राने सांगितले.
नेमकं प्रकरण काय?
‘द इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानंतर शिक्षण मंत्रालयाने सोमवारी एनसीईआरटीकडे यावर स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर या स्वायत्त संस्थेला आपला निर्णय बदलण्यास सांगण्यात आले. या चर्चेची माहिती असलेल्या एका सूत्राने सांगितले की, “जर हे चित्र इयत्ता सहावीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकात आधीपासूनच आहे, तर इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकासाठी या चित्रात फेरबदल (रिटच) का करण्यात आले, याला काहीच अर्थ नव्हता.” हा प्रश्न आधीही समोर आला होता.
२७ मे रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत, एनसीईआरटीच्या इयत्ता सहावीच्या नवीन सामाजिक शास्त्र पुस्तकांच्या पाठ्यपुस्तक विकास समितीचे प्रमुख इतिहासकार मिशेल डॅनिनो यांनी खुलासा केला होता की, सिंधू संस्कृतीवरील प्रकरणाच्या पहिल्या पानावर “डान्सिंग गर्ल” चे चित्र ठेवण्यास एनसीईआरटीने आक्षेप घेतला होता. ही मूर्ती नग्न असल्याने त्यावर वाद निर्माण होऊ शकतो, असे कारण देण्यात आले होते. डॅनिनो यांनी या भूमिकेला विरोध केला होता आणि ही मूर्ती राष्ट्रीय संग्रहालयात (नॅशनल म्युझियम) प्रदर्शित करण्यात आली असून शाळांमध्ये ती नियमितपणे शिकवली जाते, असा युक्तिवाद केला होता. अखेर त्यांनी हे चित्र प्रकरणाच्या पहिल्या पानावरून आतल्या पानावर हलवण्यास आणि त्याचा आकार लहान करण्यास मान्यता दिली असली, तरी ते चित्र पाठ्यपुस्तकात कायम राहील याची त्यांनी खात्री केली होती. इयत्ता नववीच्या कला पुस्तकाबाबत सरकारला दिलेल्या स्पष्टीकरणात, एनसीईआरटीने मूर्तीच्या धडाचा (Torso) भाग छायंकित (Shading) करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते.
विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनाशक्तीचा वापर करता यावा म्हणून असे केल्याचे त्यांनी म्हटले होते. यावर प्रतिक्रिया मिळवण्यासाठी एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. सोमवारी ‘द इंडियन एक्सप्रेस’ने सर्वात आधी दिलेल्या वृत्तानुसार, इयत्ता नववीचे नवीन कला शिक्षण पाठ्यपुस्तक ‘मधुरिमा’च्या पहिल्या प्रकरणातील “हिस्ट्री ऑफ आर्ट्स” (कलेचा इतिहास) मध्ये “डान्सिंग गर्ल”चे फेरबदल केलेले छायाचित्र दिसले होते. या चित्रात मूर्तीचा धड खांद्यापासून खाली छायंकित करण्यात आला होता, ज्यामुळे मूळ छायाचित्रांमध्ये दिसणारे शारीरिक तपशील अस्पष्ट झाले होते आणि तिने कपडे परिधान केले असल्याचा भास होत होता. हे फेरबदल केलेले चित्र अधिक लक्षवेधी ठरले कारण डान्सिंग गर्लचे चित्र गेली २५ वर्षे एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट आहे. यामध्ये एनडीए (NDA) सरकारच्या काळाचाही समावेश आहे, जेव्हा मुरली मनोहर जोशी हे तत्कालीन मानव संसाधन विकास मंत्रालयाचे प्रमुख होते.
दीर्घकाळापासून मुळ मूर्तीचे चित्र पाठ्यपुस्तकात
‘द इंडियन एक्सप्रेस’ने आधीच्या आवृत्त्यांची पाहणी केली असता, ही मूर्ती दीर्घकाळापासून शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट असली तरी तिचा धड यापूर्वी कधीही झाकला गेला नव्हता, असे आढळले. हे चित्र एनसीईआरटीच्या पहिल्या-वहिल्या कला शिक्षण मालिकेतील पाठ्यपुस्तकात आले होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF) अंतर्गत कला विषयाला मुख्य प्रवाहातील शिक्षणात समाविष्ट करण्यासाठी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत ही मालिका सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत इयत्ता पहिली ते नववीची पाठ्यपुस्तके बाजारात आली आहेत.
मोहेंजोदारो येथे सापडलेली ही साधारण चार इंच उंचीची कांस्यमूर्ती एका तरुण मुलीची आहे, जिचे केस अंबाड्यात बांधलेले आहेत आणि हातामध्ये बांगड्या, कडे व गळ्यात हार आहे. तिची आत्मविश्वासू मुद्रा आणि उत्कृष्ट कारागिरी यामुळे ही मूर्ती हडप्पा संस्कृतीच्या प्रमुख प्रतीकांपैकी एक मानली जाते. पुरातत्वशास्त्रज्ञांनी या मूर्तीला सिंधू संस्कृतीच्या प्रगत धातूशास्त्राच्या ज्ञानाचा पुरावा मानले आहे. ही मूळ कलाकृती नवी दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयात जतन करून ठेवलेली आहे.
