NCERT Dancing Girl Artefact: NCERT नं एका नव्या ऐतिहासिक संदर्भाबाबत घेतलेल्या निर्णयाची सध्या चर्चा चालू आहे. ९वीच्या वर्गासाठीच्या एका पुस्तकात छापून आलेल्या हडप्पा संस्कृतीकालीन मूर्तीच्या फोटोचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. ही हडप्पाकालीन संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारी अत्यंत महत्त्वाची व सुप्रसिद्ध मूर्ती असून ‘डान्सिंग गर्ल’ असं तिचं नामकरण करण्यात आलं आहे. मूळ मूर्ती नग्नावस्थेत असताना पुस्तकात छापून आलेल्या मूर्तीच्या अंगावर मात्र कपडे दिसत आहेत. तसेच, या मूर्तीवरून वाद होऊ शकतो, म्हणून पुस्तकाच्या मुखपृष्ठावर मूर्तीचा फोटो छापण्यास एनसीईआरटीनं विरोध दर्शवला होता. त्यामुळेच हा फोटो पुस्तकाच्या आतल्या पानांत छापण्याचा निर्णय घेण्यात आला.
NCERT च्या पुस्तकाचा नवा वाद काय?
इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, हडप्पा संस्कृतीतील ‘डान्सिंग गर्ल’ NCERT च्या ९वीच्या पुस्तकात वेगळ्या रुपात अवतरली आहे. मूळच्या ब्रॉन्झच्या काळ्या रंगातल्या प्रतिकृतीच्या फोटमध्ये या मूर्तीच्या अंगावर कपडे दिसत आहेत. मूर्तीच्या मूळ नग्न स्वरूपावर एनसीईआरटीच्या काही सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. History of Arts या पुस्तकाच्या पहिल्याच धड्यात आतल्या पानात हा मूर्तीचा फोटो छापण्यात आला आहे. त्यामुळे सदर काळातील महिला या कपड्यांचा वापर करायच्या, असा संदेश त्यातून जात असल्याचा दावा टीकाकारांनी केला आहे.
२५ वर्षांपासून छापून येतोय Dancing Girl चा फोटो!
दरम्यान, NCERTच्या पुस्तकांत हा फोटो पहिल्यांदाच छापून आलेला नसून गेल्या २५ वर्षांपासून मूळ तांब्याच्या धातूच्या मूर्तीचा हा फोटो छापून येत आहे. अगदी एनडीए सरकारच्या काळातदेखल मुरली मनोहर जोशी शिक्षण मंत्री असताना हा फोटो छापून आला आहे. तेव्हा मात्र या मूर्तीच्या अंगावर कपडे दाखवण्यात आले नव्हते. आता नुकत्याच छापून आलेल्या पुस्तकात मात्र तसे बदल करण्यात आलेले आहेत.
काय आहे डान्सिंग गर्लची वैशिष्ट्ये?
‘डान्सिंग गर्ल’ म्हणून संबोधण्यात आलेली ही मूर्ती मूळची तांब्याच्या धातूची असून मोहेंजोदाडो उत्खननावेळी ही मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती एका तरुण मुलीची असून तिचे केस मागे बांधलेले आहेत. तिच्या हातात बांगड्या, ब्रेसलेट आणि गळ्यात नेकलेसदेखील आहे. ही मूर्ती साधारण चार इंचांची आहे. या मूर्तीत साकारण्यात आलेल्या मुलीचा आत्मविश्वास आणि तिच्या सुबकतेतून दिसणारं कौशल्य यामुळे ही मूर्ती हडप्पा संस्कृतीचं अनोखं प्रतिक ठरली. मूळ तांब्याची मूर्ती दिल्लीतील नॅशनल म्युझियममध्ये ठेवण्यात आलेली आहे.
NCERT चं नेमकं म्हणणं काय?
दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसला २७ मे रोजी दिलेल्या मुलाखतीत इतिहासकार मायकेल डॅनिनो यांनी यासंदर्बात भाष्य केलं आहे. डॅनिनो हे NCERT च्या ६वीच्या सामाजिक विज्ञान पुस्तकाच्या विकास समितीचे प्रमुख देखील होते. डान्सिंग गर्ल मूर्तीचा फोटो पुस्तकाच्या मुखपृष्ठावर ठेवण्यास एनसीईआरटीचा विरोध असल्याचं त्यांनी सांगितलं. मूर्ती नग्न स्वरूपातील असून त्यावरून वाद उद्भवू शकतो, असं एनसीईआरटीचं म्हणणं होतं.
“मी तेव्हा एनसीईआरटीला एवढंही म्हणालो की डान्सिंग गर्ल मूर्ती जर आक्षेपार्ह स्वरूपाची असेल, तर मग मूळ मूर्ती ठेवलेल्या नॅशनल म्युझियममध्ये आपण मुलांना प्रवेश बंदी करायला हवी”, असं डॅनिनो म्हणाले. पण नंतर त्यांनी यावर सहमती दर्शवली व मूर्तीचा फोटो आतल्या पानात घेण्यात आला. त्याचा आकार मात्र कमी करण्यात आला.
“मूर्तीला कपडे घातल्याचं दाखवणं चूक”
दरम्यान, अशा प्रकारे डान्सिंग गर्ल कपडे घातल्याचं दाखवणं हे मूर्तीचं चुकीचं सादरीकरण असून तो विद्यार्थ्यांवर अन्याय आहे, अशी स्पष्ट प्रतिक्रिया संगीत नाटक अकादमीच्या प्रमुख संध्या पुरेचा यांनी दिली आहे. शिवाय, असं करणं म्हणजे सेन्सॉरशिपचाच एक प्रकार असल्याचंही त्या म्हणाल्या.
“डान्सिंग गर्लचं असं सादरीकरण म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. एकतर त्या ऐतिहासिक मूर्तीचं स्वरूप इतकं छोटं करून ठेवलं आहे की त्यात त्या मुलीचे हावभाव किंवा तिच्या अंगावर असणारे दागिने ओळखताही येत नाहीत. दुसरं म्हणजे तिला कपडे घातलेलं दाखवणं म्हणजे सेन्सॉरशिप आहे. तिसरं म्हणजे अशा प्रकारे त्या मूर्तीच्या प्रतिमेमध्ये छेडछाड करणे म्हणजे कधी अस्तित्वातच नव्हतं, असं स्वरूप मूर्तीला देणं. हे अगदी चुकीचं आहे”, असं पुरेचा यांनी सांगितलं.
