आपला चिमुकला किंवा चिमुकलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याचे अनेकांना वेड असते. या लहानग्यांच्या वेगवेगळ्या अदा आणि त्यांचे गोंडस बोबडे बोल असणारे व्हिडियो अगदी सहज सोशल केले जातात. पण अशाप्रकारे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडियो शेअर करणे धोक्याचे असल्याचे नुकतेच सांगण्यात आले आहे. अशा गोष्टी करणे टाळावे असे नॅशनल काऊंसिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग या संस्थेकडून सांगण्यात आले आहे. याबाबत देशभरातील प्राथमिक शाळांना सांगण्यात आले आहे. व्हिडियो काढताना मुलांबाबत गोपनियता पाळणे आवश्यक आहे. काही पूर्व प्राथमिक शाळांकडून मुलांचे व्हिडियो आणि ऑडियो घेतले जातात. यामध्ये मुलांच्या पालकांची परवानगी घेतली जात नाही. मात्र असे करणे चुकीचे असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

अनेकदा पूर्व प्राथमिक शाळेत मुलांचे कविता म्हणतानाचे किंवा इतर काही व्हिडियो फेसबुकसारख्या माध्यमातून शेअर केले जातात. मग या पोस्टला अनेक लाईक्स आणि कमेंटस मिळतात. अनेक जण शाळांच्या वेबसाईट किंवा फेसबुकवरच्या पोस्ट पाहतात. मग हे लोक मुल शाळेत कधी जाते, कसे जाते, घरी कधी येते यावर लक्ष ठेवतात. मग या मुलांचे नाव, घराचा पत्ता, इयत्ता यांचीही माहिती काढली जाते. या माहितीचा गैरवापर करुन मुलांचे अपहरण केले जाते, अनेकदा त्यांचे लैंगिक शोषण करण्यात येते.

एका सर्वेक्षणानुसार, २०१६ मध्ये ५९ टक्के बलात्कार हे अल्पवयीनांवर झाले होते. यातही अनेकांना शाळेच्या बाहेर गाठण्यात आल्याचेही या अहवालात म्हटले आहे. तसेच जर पालकांनी आपल्या मुलांचे फोटो किंवा व्हिडियो शेअर केलेच तर ते केवळ आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना दिसतील अशी सेटींग आवश्यक करावी. मुलांचे डिजिटल किडनॅपिंग केले जाते. यामध्ये मुलांचे छायाचित्र चोरले जाते आणि ते व्हायरल केले जाते. तसेच मुलांच्या गोपनियतेबाबतही कोणताच विचार केला जात नाही. त्यामुळे पालकांनी ही गोष्ट लक्षात घेऊन योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे असे या अहवालात म्हटले आहे.