पीटीआय, नवी दिल्ली

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला (एनसीईआरटी) अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. आता या संस्थेला स्वत:च्या पदव्या देण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) सल्ल्यानुसार एनसीईआरटी आणि तिच्या सहा घटक संस्थांना स्वतंत्र श्रेणीअंतर्गत अभिमत विद्यापीठ म्हणून घोषित केले.

या घटक संस्थांमध्ये अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूर आणि शिलाँग येथील प्रादेशिक शिक्षण संस्था तसेच भोपाळ येथील पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्थेचा समावेश आहे. शालेय शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून एनसीईआरटी विविध उपक्रम राबवते. यामध्ये शैक्षणिक संशोधन, अभ्यासक्रम निर्मिती, तसेच पाठ्यपुस्तके आणि अध्यापन-अभ्यास साहित्य विकसित करणे यांचा समावेश होतो.

तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने एनसीईआरटीला ‘डी नोवो’ श्रेणीत अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यास मंजुरी दिली होती. या दर्जाबरोबर काही अटीही घालण्यात आल्या आहेत. एनसीईआरटीला कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक किंवा नफा कमावणार्‍या उपक्रमांत सहभागी होता येणार नाही. तसेच सर्व शैक्षणिक अभ्यासक्रम यूजीसी आणि संबंधित वैधानिक संस्थांच्या निकषांनुसारच चालवावे लागतील.