NCERT withdraws Class 8 social science book : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात एनसीईआरटीने प्रकाशित केलेल्या इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील एका धड्यावरून वाद निर्माण झाला होता. यानंतर आता एनसीईआरटीने या प्रकरणात बिनशर्त माफी मागितली आहे. तसेच हे पुस्तक मागे घेण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. इयत्ता आठवीच्या या पुस्तकात ‘समाजातील न्यायपालिकेची भूमिका’ या धड्याचा समावेश करण्यात आला होता, ज्यामध्ये ‘न्यायपालिकेतील भ्रष्टाचार’ या विषयाचा समावेश करण्यात आल्याने त्यावर टीका करण्यात आली होती.

एनसीईआरटीने एक्सवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) नुकतेच इयत्ता ८ वी (भाग २) साठी ‘एक्सप्लोरिंग सोसायटी: इंडिया अँड बियॉन्ड’ हे सामाजिक शास्त्राचे पाठ्यपुस्तक प्रकाशित केले होते, ज्यात आपल्या समाजातील न्यायपालिकेची भूमिका नावाच्या चौथ्या प्रकरणाचा समावेश होता.”

“एनसीईआरटीचे संचालक आणि सदस्य या चौथ्या प्रकरणासाठी बिनशर्त आणि विनाअट माफी मागतो. संपूर्ण पुस्तक मागे घेण्यात आले असून ते आता उपलब्ध नाही,” असे या संस्थेने म्हटले आहे.

आठवीच्या पुस्तकातील या धड्याबाबत फक्त राजकीय क्षेत्रातूनच नाही तर सर्वोच्च न्यायालयाने देखील टिप्पणी केली होती. गेल्या महिन्यात, सर्वोच्च न्यायालयाने एनसीईआरटीच्या इयत्ता ८ वी च्या या पुस्तकाच्या पुढील प्रकाशनावर, पुनर्मुद्रणावर किंवा डिजिटल प्रसारावर पूर्ण बंदी घातली होती.

पुस्तकात काय होते?

एनसीईआरटीने २३ फेब्रुवारी इयत्ता ८ वीच्या समाजशास्त्र विषयाचे नवीन पाठ्यपुस्तक प्रसिद्ध केले होते. या नव्या पुस्तकात ‘न्यायपालिकांची समाजातील भूमिका’ या धड्याचा समावेश करण्यात आला होता. या धड्यात न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि कोट्यवधी प्रलंबित खटले या मुद्याचा देखील समावेश केला होता. न्यायव्यवस्थेमध्ये विविध स्तरांवर होणारा भ्रष्टाचार आणि प्रलंबित खटल्यांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. तसेच, खटल्यांच्या विलंबासाठी न्यायाधीशांची अपुरी संख्या, किचकट कायदेशीर प्रक्रिया आणि अपुऱ्या पायभूत सुविधा ही कारणे असल्याचे म्हटले होते.