Jitendra Awhad on Bangladesh Crises: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बांगलादेशमध्ये हिंदू नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पदावरून दूर केल्यानंतर बांगलादेशमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकीय क्रांती घडवूनही बांगलादेशमधील हिंसाचार थांबण्याचे नाव नाही. संतप्त जमाव हिंदूंना लक्ष्य करत असून मंदिरे आणि वसाहतींवर हल्ले करत आहे. आरक्षणासाठी विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन आता वेगळेच वळण घेत असल्याचे दिसत आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. काय म्हणाले जितेंद्र आव्हाड? जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर काही बातम्या शेअर करत आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे. ते म्हणाले, "बांगलादेशात हिंदूंवर होणारा अन्याय ह्रदयद्रावक आहे. जी क्रांती अल्पसंख्याकांची सुरक्षा आणि सन्मान राखू शकत नाही त्याला क्रांती म्हणता येणार नाही. अल्पसंख्यांकाना लक्ष्य करणे हे नेभळपणाचे लक्षण आहे." हे वाचा >> Bangladesh Protest: बांगलादेशमधील आंदोलनात हिंदू मंदिरे लक्ष्य; इस्कॉन मंदिराला आग लावली "क्रांती सत्ता उलथून टाकतात, परंतु दिशाहीन संघर्ष अराजकता देखील माजवतात. म्हणूनच बांगलादेशातील विद्यार्थी नेते आणि नवीन सरकारने बांगलादेशातील कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी तात्काळ पावले उचलणे गरजेचे आहे. भूमी कुठलीही असो, अल्पसंख्याकांचे संरक्षण झालेच पाहिजे", असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. हे ही वाचा >> Hindu Refugee in Bangladesh : “बांगलादेशात हिंदूंची कत्तल, १ कोटी हिंदू निर्वासित…”, भाजपाच्या नेत्याने व्यक्त केली भीती ज्यादिवशी शेख हसीना यांनी बांगलादेश सोडून भारतात प्रवेश केला, तेव्हापासून हिंदूंना लक्ष्य करणे सुरू झाले. आज गुरुवारी (दि. ८ ऑगस्ट) नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस हे अंतरिम सरकार स्थापन करणार आहेत. त्यानिमित्ताने अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार थांबविण्यात यावेत, असे आवाहन भारतातील विविध नेत्यांनी केले आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार, बांगलादेशमधील जेसोर, सातखीरा आणि पटुआखली येथील हिंदूंची घरे आणि व्यवसायांना लक्ष्य करण्यात आले आहे. घरे जाळण्यात आली असून दुकानांची लूट केली गेली आहे. घरांमधूनही सिलिंडर, संगणक, वातानुकूलित यंत्र, एवढंच नाही तर घरातील अन्नपदार्थही लुटून नेले जात आहेत. आणखी वाचा >> बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू धोक्यात; भारतासमोर हिंदू निर्वासितांच्या आश्रयाचे संकट? सोमवारी समाजकंटकांनी ढाक्यातील धानमंडी येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राची तोडफोड केली. (छायाचित्र-रॉयटर्स) विश्व हिंदू परिषदेकडून केंद्र सरकारला आवाहन बांगलादेशमधील हिंदूवर वाढत्या अत्याचाराबद्दल विश्व हिंदू परिषदेनेही चिंता व्यक्त केली आहे. तसेच केंद्र सरकारला विनंती करून हिंदूंचे रक्षण करण्याची मागणी केली आहे. विश्व हिंदू परिषदेचे मध्य भारत प्रांत मंत्री राजेश जैन माध्यमांशी बोलताना म्हणाले की, बांगलादेशमधील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावेत. शेजारी देशात हिंदूंवर अत्याचार वाढला असून त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी भारताने पार पाडावी, अशी मागणी त्यांनी केली.