NCP Merger News: अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीबाबत माहिती नसल्याचे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवारांनी केले होते. त्यानंतर राज्यभरात चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, पार्थ पवार यांनी गोविंदबाग निवासस्थानी संपूर्ण पवार कुटुंबाशी सविस्तर चर्चा केली होती. या चर्चेचा ‘सस्पेन्स’ कायम होता. अशातच विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि दिवंगत अजित पवारांचे निकटवर्तीय किरण गुजर यांनी मोठा खुलासा केला आहे. अजित पवारांची शेवटची इच्छा संपूर्ण पवार कुटुंब पूर्ण करतील आणि तसा सकारात्मक निर्णय झालाचे गुजर यांनी सांगितले होते.

“अजितदादांची अंतिम इच्छा लवकर पूर्ण होणार”

अजित पवारांची अंतिम इच्छा लवकर पूर्ण होईल आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील, अशी माहिती किरण गुजर यांनी दिली. ते म्हणाले की, ‘पुढील दहा ते अकरा दिवस पवार कुटुंब या विषयावर बोलणार नाही पण दोन्ही पक्षाचे विलीनीकरण होऊ शकते. २१ जानेवारीला अजित पवारांनी मला सांगितले होते की राष्ट्रवादीचे काँग्रेसचे विलीनीकरण केलं पाहिजे. त्याबद्दल चर्चाही सुरू आहे असं त्यांनी सांगितले होते, असा दावा गुजर यांनी केला आहे.

पवार कुटुंबात चर्चा

गुजर म्हणाले, “दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याचा निर्णय पक्का झाला आहे. अजित पवारांच्या इच्छेनुसार राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार आहे. ही प्रक्रिया असल्याने थोडा वेळ लागेल आणि याबद्दलची अधिकृत घोषणा पक्षाच्या नेतृत्वाकडून करण्यात येईल”. दरम्यान बारामतीत शरद पवार, आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार, पार्थ पवार, राजेंद्र पवार आणि रणजित पवार यांच्यात सविस्तर चर्चा झाली. चर्चेनंतर युगेंद्र पवार, पार्थ पवार आणि आमदार रोहित पवार गोविंदबागेतून बाहेर पडताना त्यांनी माध्यमांना कोणतीही माहिती दिली नव्हती.

“अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र”

किरण गुजर यांनी सांगितले की, “विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या परिसरात अजित पवार यांचे स्मारक उभारण्यासह विविध विषयांवर शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली आहे. आम्ही सर्वजण अजित पवारांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र आहोत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला असून, त्यावर लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल.”

रोहित पवारांची भावनिक पोस्ट

आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांची आठवण काढत एक भावनिक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “म्हणतात ना, एखादा माणूस किती मोठा होता हे समजण्यासाठी त्याला आधी जगाचा निरोप घ्यावा लागतो. अजितदादांचे मोठेपण माझ्यासारख्या कुटुंबातील व्यक्तीला सुरुवातीपासूनच माहीत होते. मात्र त्यापेक्षाही अजितदादा किती मोठे होते, हे मला आता पुन्हा नव्याने अनुभवायला मिळत आहे. अजितदादांवर प्रेम करणारी ही माणसं आज पोरकी झाली आहेत आणि त्यांच्या डोक्यावर पुन्हा छत्र धरण्याची अतिशय अवघड जबाबदारी आमच्यासारख्या नव्या पिढीवर आली आहे. ती जबाबदारी आम्ही आमच्या परीने नक्कीच पार पाडू; मात्र तरीही प्रश्न उरतोच की, अजितदादांच्या नसण्याने निर्माण झालेली ही भलीमोठी पोकळी कोण आणि कशी भरून काढणार?”

विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर हे दिवंगत नेते अजित पवारांचे निकटवर्तीय होते. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट लवकरच एकत्र येण्याची शक्यता आहे. दरम्यान, पार्थ पवार यांच्या गोविंदबागेतील भेटीबाबत निर्माण झालेला ‘सस्पेन्स’ देखील गुजर यांनी फोडला. या भेटीदरम्यान पार्थ पवार यांनी कुटुंबीयांसोबत सविस्तर चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले.