देशात करोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ओमायक्रॉनचा देखील बहुतांश राज्यांमध्ये प्रसार झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कठोर निर्बंधांची चर्चा सुरू झाली आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असताना आता त्यासाठी भाजपा जबाबदार असेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात मोठ्या संख्येने करोनाचे रुग्ण वाढले असून जवळपास दीड हजार ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनामुळे एकीकडे चिंता वाढली असताना दुसरीकडे उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार रंगात आला आहे. या प्रचारसभांना मोठी गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे. या मुद्द्यावरून नवाब मलिक यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

“भाजपाचे लोक पंतप्रधानांचं ऐकत नाहीत”

“मुंबई, महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढत आहे. पंतप्रधान लोकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवायला, मास्क लावायला सांगत आहेत. पण तरीही भाजपाचे लोक त्यांचं ऐकत नाही. उत्तर प्रदेशमध्ये गृहमंत्री, योगी हजारोंच्या संख्येनं लोक जमवतायत. त्यांच्या प्रचारसभा थांबत नाहीत. इतर राज्यांत निवडणुका असताना दुसरी लाट आली, त्याचप्रमाणे तिसरी लाट निर्माण करण्यात भाजपाच्या लोकांचा हात राहील हे स्पष्ट आहे”, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

करोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने केंद्र सरकार सतर्क; नव्या लक्षणांसह आठ राज्यांना विशेष सूचना

भाजपाचा निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव?

दरम्यान, भाजपा ५ राज्यांमध्या निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव करत असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. “निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव करू नका. निवडणुका वेळेवर घ्या. राष्ट्रपती राजवट लावून राज्यांचे अधिकार आपल्या हातात घेण्याचा डाव पुढे आणू नका. निवडणूक घेत असताना पाच लोकांपेक्षा जास्त प्रचाराला हजर राहणार नाही, डोअर टू डोअर प्रचार करणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे अशा निवडणुका होऊ शकतात. भाजपाला उत्तर प्रदेशात सत्ता जाताना दिसत आहे. योगींचा चेहरा बाजूला करून त्यांना उत्तर प्रदेशात निवडणुका घ्यायच्या आहेत. त्यासाठी निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव भाजपा खेळू शकते”, असं नवाब मलिक म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp nawab maik targets bjp on corona third wave uttar pradesh election rallies pmw
First published on: 01-01-2022 at 14:17 IST