जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याचे देशभर पडसाद उमटत आहेत. विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून निषेध नोंदवत आहेत. मुंबई, पुण्यातही हल्ल्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रविवारी रात्री चेहरे झाकलेल्या लाठय़ा-काठय़ाधारी हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात अनेक विद्यार्थ्यांसह प्राध्यापक जखमी झाले आहेत. विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेषी घोषदेखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनीदेखील जेएनयूमधील हिंसाचारावर मत नोंदवलं असून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पार्थ पवार यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “जेएनयूमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांविरोधात करण्यात आलेल्या हिंसाचार चुकीचा असून निषेधार्ह आहे. हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे”.

दिल्ली पोलिसांकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
जवाहरलाल नेहरु विद्यापीठ हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मालमत्तेचं नुकसान, हिंसाचार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीसीपी देवेंद्र आर्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही घटनेची दखल घेतली आहे. सोशल मीडिया आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून आम्ही माहिती मिळवत आहोत. दरम्यान रुग्णालयात दाखल २३ विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गृहमंत्र्यांच्या समर्थनाविना हल्ला होणं शक्य आहे का ? सुरजेवाला यांचा सवाल
काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून जेएनयू हिंसाचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. गृहमंत्र्यांच्या समर्थनाविना हल्ला होणं शक्य आहे का ? असा सवाल त्यांनी विचारला आहे. “१) जेएनयू कॅम्पसमध्ये झालेला हल्ला पूर्वनियोजित होता २) या हल्ल्याला जेएनयू प्रशासनाचं समर्थन होतं ३) हे भाजपाचे गुंड होते ४) विद्यार्थी/प्राध्यापकांना मारहाण होत असताना पोलीस मात्र मूकदर्शक होऊन पाहत होते…हे सगळं गृहमंत्र्यांच्या समर्थनाविना शक्य आहे का ?,” अशी विचारणा सुरजेवाला यांनी केली आहे.