पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ते पहिल्यांदा इटलीच्या दौऱ्यावर गेले आहेत. इटलीमध्ये जी ७ शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या जी ७ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या दौऱ्यावर आहेत. जी ७ परिषद ही इटलीत असल्याने यजमान देशाच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी आलेल्या नेत्यांचे स्वागत केले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही स्वागत करण्यात आलं. जी ७ शिखर परिषदेला जगभरातील विविध देशांचे पंतप्रधान व राष्ट्राध्यक्षही सहभागी झाले आहेत. या परिषदेमध्ये जागतिक पातळीवरील काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या इटलीच्या दौऱ्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने टीका केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे तेथे कायम तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. हिंसाचाराच्या घटनांमध्ये अनेक लोकांचा मृत्यूही झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्यापही पूर्णपणे तेथील परिस्थिती सुरळीत झालेली नाही. काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना अद्यापही थांबलेल्या नाहीत. त्यामुळे मणिपूरच्या काही भागातील जनजीवन अद्यापही विस्कळीत आहे.

हेही वाचा : उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमधील अलकनंदा नदीत बस कोसळून १२ जण ठार, १५ जखमी!

दुसरीकडे नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ते परदेश दौऱ्यावर गेले आहेत. यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने हल्लाबोल करत काही सवाल केले आहेत. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना एकदाही मणिपूरमध्ये जावेसे वाटले नाही. हीच का मोदींची गॅरंटी?’, अशा शब्दांत टीका केली. तसेच ट्विटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इटलीमधील स्वागताचा व्हिडीओ आणि मणिपूरमधील परिस्थिती सांगणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ ट्विट करत खोचक शब्दांत टीका करण्यात आली आहे.

ट्विटमध्ये काय म्हटलं?

“मणिपूरमध्ये गेल्या १३ महिन्यांपासून हिंसाचार कायम असून जनजीवन अद्याप विस्कळीत आहे. परंतु निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकांच्या दरम्यान आणि निवडणुकीनंतर एकदाही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मणिपूरमध्ये जावेसे वाटले नाही. याउलट परदेश दौरे करण्यातच पंतप्रधान मोदीजी रमले आहेत. मणिपूरवासियांना वाऱ्यावर सोडण्याची हीच आहे का मोदींची गॅरंटी?”, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

मणिपूरच्या जिरीबाम आणि इतर काही जिल्ह्यात गेल्या जवळपास १३ महिन्यांपासून हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मणिपूरच्या काही भागातील जनजीवन अद्यापही विस्कळीत आहे. येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अद्यापही काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. दरम्यान, मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांवरून विरोधी पक्षातील नेते सरकारवर टीका करत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत काही सवाल केले आहेत.