MP Supriya Sule meet Defence Minister Rajnath Singh: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटाबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार असल्याचे सांगितले जाते. मात्र दोन्ही गटांकडून अशी शक्यता वारंवार फेटाळण्यात आलेली आहे. भाजपाशी संलग्न असलेले आमदार रवी राणा यांनी मागच्या आठवड्यात दावा केला होता की, सुप्रिया सुळे यांना केंद्रात असतील तर सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्याची जबाबदारी असेल. यानंतर आज दिल्लीमध्ये एक लक्ष्यवेधी घटना घडली. सर्वपक्षीय बैठकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला.

कोणत्याही इतर क्षेत्रात आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असलेल्यांचा आशीर्वाद घेणे, ही सामान्य बाब आहे. राजकारणही त्याला अपवाद नाही. इथे विरोधी पक्षातील, विरोधी विचारधारेतील ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान केला जातो. त्यांच्याकडून आशीर्वाद आणि प्रसंगी मार्गदर्शनही घेतले जाते. सुप्रिया सुळे यांनीही अशाचप्रकारे वरिष्ठ असलेल्या राजनाथ सिंह यांचा आशीर्वाद घेतला. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबतचा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर शेअर केला आहे.

सोमवारपासून (२० जुलै) दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आज दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर बाहेर पडत असताना सुप्रिया सुळे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी केंद्रीय मंत्री जेपी नड्डाही तिथे उपस्थित होते. याचा व्हिडीओही आता समोर आला आहे.

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत सकारात्मक?

यंदाच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारकडून लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेचे विधेयक पुन्हा मांडले जाणार असल्याचे सांगितले जाते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक मंजूर होऊ शकले नाही. त्यानंतर भाजपाने व्यूहरचना आखत विरोधकांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न सुरू केला. सुप्रिया सुळे यांनीही मागच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन या विधेयकाबाबत पहिल्यांदाच सकारात्मक मत मांडले होते.

Supriya Sule on Delimitation Bill stance
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरुन होणाऱ्या चर्चांवर सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केली भूमिका

विधेयकाचा मसुदा पाहून ठरवू

“केंद्र सरकारकडून नव्या विधेयकाचा मसुदा मिळाल्यानंतर इंडिया आघाडी त्याची चर्चा करून पाठिंबा द्यायचा की नाही, याचा निर्णय घेतला जाईल. हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून नव्हे, तर इंडिया आघाडी म्हणून एकत्रितपणे घेतला जाईल. लोकसंख्येच्या आधारे नाही, तर सर्वच राज्यांत सरसकट जागांमध्ये ५० टक्के वाढ आणि मतदारसंघांचे विभाजन करण्याचे प्रारुप पाहूनच अंतिम निर्णय घेऊ”, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली होती.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा फेटाळली

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची मागच्या आठवड्यात भेट झाली. या बैठकीनंतरही अनेक चर्चांना पेव फुटले होते. मात्र ही भेट पूर्वनियोजित असल्याचे नंतर सांगितले गेले. सुप्रिया सुळेंनीही ही चर्चा फेटाळून लावली. त्या म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला काँग्रेस, भाजप, शिवसेनेत विलिनकरण करून झाले आहे. आता फक्त मनसेत विलिनकरण करण्याचे राहिले आहे.”

मंत्रीपदाच्या चर्चेवरही दिले उत्तर

रवी राणा यांचा दावा आणि राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चेनुसार, सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा होती. यावरही सुप्रिया सुळेंनी भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, “माझ्यापर्यंत या चर्चा आलेल्या नाहीत. मी, शरद पवार, अनिल देशमुख, राजेश टोपे किंवा पक्षातील इतर नेत्यांना असा कोणताही प्रस्ताव कोणालाही कोणत्याच पक्षाकडून आलेला नाही.”