शरद पवारांनी यु-टर्न घेतल्याच्या मोदींच्या टीकेला सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर; म्हणाल्या…

“…ही आमची संस्कृती नाही”

संग्रहीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायद्यांवरुन पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत बोलताना शरद पवार आज अचानक उलट बोलत आहेत अशी टीका नरेंद्र मोदींनी केली. खासदार सुप्रिया सुळे यावेळी सभागृहात उपस्थित होत्या. दरम्यान मोदींनी केलेल्या या टीकेला सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं आहे.

“मोदींनी आमच्या पक्षाच्या प्रमुखांवर टीका केली. मी उभं राहून त्यांना थांबवू शकत होते, पण ही आमची संस्कृती नाही. मला काही कागदपत्रं, तथ्य समोर मांडायचं आहे. भाजपा सदस्य असले तरी ते देशाचे पंतप्रधान असल्याने त्यांनी सभागृहात मांडलेला मुद्दा गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला दिला. मात्र यावेळी त्यांनी राज्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे अमलबजावणी केली जावी हे वाचलं नाही,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

सुप्रिया सुळेंसमोर नरेंद्र मोदींची सभागृहात शरद पवारांवर टीका; म्हणाले…

“मोदींनी यु-टर्न हा शब्द वापरला त्यामुळे मला या सरकारने घेतलेल्या यु-टर्नबद्दल सांगायचं आहे. मनमोहन सिंग सरकारने जीएसटी आणलं होतं, तेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी याला विरोध केला होता. आम्ही आरटीआय, अन्न सुरक्षा, शिक्षण हक्क, आधार, मनरेगा अशी अनेक विधेयकं आणली. बदल झाला पाहिजे यावर आमचा विश्वास आहे. जेव्हा ही विधेयकं आणण्यात आली तेव्हा सर्वांशी चर्चा करुन, त्यांचं मत मागवूनच कायदे करण्यात आले. मनरेगामुळे करोना संकटात नोकरी गेलेल्यांना रोजगार मिळाला. आधारलाही विरोध करण्यात आला होता, आणि आज ते जीएसटी, मनरेगा, आधारवरुन आपली पाठ थोपटत आहे. आता हा नेमका कोणता टर्न आहे मला माहिती नाही,” अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे.

“पंतप्रधानांनी इंटेंट आणि कंटेंट असा उल्लेख केला. त्यांनी केलं तर इंटेट आणि कंटेंट आणि आम्ही केलं तर यु-टर्न….हे थोडं चुकीचं आहे. त्यातही खासकरुन इतक्या मोठ्या व्यक्तीकडून येणं,” अशी खंत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली.

“शरद पवारांनी त्यावेळी कायदा बदलण्याची शिफारस केली होती. तोच मार्ग या सरकारने का निवडला नाही. जर हे पत्र सर्व मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं तर मग शरद पवार कृषीमंत्री असताना एकही आंदोलन का झालं नाही. मी त्यांची बाजू मांडत नाही आहे, तेवढी क्षमता त्यांच्याकडे आहे. पण मला काही तथ्य मांडायचं कारण पंतप्रधानांनी त्यांचं नाव घेतलं,” असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

मोफत लसीकरणावरुन टीका
“निर्मला सीतारमन बिहारमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मोफत लस देण्याची घोषणा केली होती. बिहारमध्ये देऊ शकतो तर महाराष्ट्रात का नाही? आम्हालाही आनंद होईल. जर तुम्ही बिहारमध्ये मोफत लसीकरणाला सुरुवात केली असेल तर तशी माहिती द्यावी. महाराष्ट्राला २६ हजार ५९७ कोटींची जीएसटी भरपाई मिळं बाकी आहे. हे पैसै मिळाले तर आम्हीदेखील मोफत लसीकरण करु,” असं सुप्रिया सुळे यांनी निर्मला सीतारमन यांना सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp supriya sule pm narendra modi allegations on sharad pawar over farm laws sgy

ताज्या बातम्या