“स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १५ ऑगस्ट २०२२ पूर्वी भारतात राहणारा मुलगा किंवा मुलगी अंतराळात जाईल”, असे आश्वासन काहीवर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. राष्ट्रवादीने हा जुना व्हिडीओ ट्वीट करून मोदींना त्यांच्या या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. आत्तापर्यंत अंतराळात कुणाला पाठवलं? असा खोचक सवाल राष्ट्रवादीने मोदी यांना केला आहे.

Har Ghar Tiranga: इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर तिरंगा प्रोफाइल पिक्चर कसा टाकायचा? जाणून घ्या

२०२२ पूर्वी भारतीय तरुण किंवा तरुणी अंतराळात भारताचा राष्ट्रध्वज घेऊन जातील, असे नरेंद्र मोदी या व्हिडीओमध्ये म्हणाले होते. मोदींच्या या आश्वासनाचे काय झाले, असा सवाल राष्ट्रवादीने केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. पंतप्रधानांचे हे आश्वासन जुमला होते, असे एका युजरने म्हटले आहे. तर भारतीय तरुण-तरुणी अंतराळात जाणारच असा विश्वास एका नेटकऱ्याने वर्तवला आहे. राष्ट्रवादीचा हा व्हिडीओ अनेकांनी रिट्वीट केला आहे.

देशात सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. येत्या १५ ऑगस्टला ब्रिटिशांकडून भारताला स्वतंत्र होऊन ७५ वर्ष होतील. यानिमित्ताने केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ या अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानाअंतर्गत घरोघरी झेंडा फडकवण्याचे आवाहन सरकारकडून जनतेला करण्यात आले आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान भारतातील प्रत्येकाने घरावर तिरंगा फडकवावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून केले होते. आपला पुढील २५ वर्षांचा हा अमृतकाळ प्रत्येक देशवासियांसाठी कर्तव्यकाळ आहे. आपल्या शूर सैनिकांनी ही जबाबदारी आपल्याला दिली आहे आणि ती पूर्ण करायची असल्याचा निश्चय पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला होता.