NCPI Rebel TMC MPs BJP Alliance: तृणमूल काँग्रेसच्या २० बंडखोर खासदारांनी प्रवेश केल्यामुळे देशाच्या राजकारणात चर्चेत आलेल्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया पक्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भाजपाशी युतीवरुन त्रिपुरातील ‘एनसीपीआय’मधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. ‘एनसीपीआय’मधील तीन मुस्लिम खासदारांनी पक्षाच्या भाजपाबरोबरच्या युतीबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तीन खासदार अस्वस्थ

सूत्रांच्या हवाल्याने एनडीटीव्हीने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, तृणमूलचे बंडखोर आणि सध्या एनसीपीआयचे असलेले खासदार अबू ताहेर खान, खलीलूर रहमान आणि युसूफ पठाण भाजपाबरोबरच्या युतीवर नाराज असून त्यांनी सत्ताधारी एनडीएच्या बैठकीला दांडी मारली आहे. भाजपाच्या जवळ गेल्यास पारंपारिक मतदार वर्ग दुरावण्याची भीती त्यांना या खासदारांना सतावत आहे, असेही सूत्रांनी म्हटले आहे.

एसआयआरवरुन नाराजी

अबू ताहेर खान, खलीलूर रहमान यांनी शनिवारी मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांची भेट घेऊन विशेष तीव्र फेरतपासणी मोहिमेदरम्यान मुर्शिदाबादमधील लोकांना त्रास देण्यात आल्याचा आरोप केला. दरम्यान, “आम्ही भाजपाबरोबर जाणार नाही आणि एनडीएचा भाग होणार नाही,” असे अबू ताहेर खान यापूर्वी माध्यमांशी बोलताना म्हणाले होते. “मुस्लिम समुदायाकडे, विशेषतः जे मागासलेले आहेत, त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे”, असेही खान यांनी नमूद केले होते. ममता बॅनर्जी गटाचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी यांनी या बंडखोर खासदारांवर टीका करताना दिशाभूल करत असल्याचा आरोप केला.

आरोप – प्रत्यारोप

एनसीपीआयने समर्थनाचे पत्र दिले आहे. एनसीपीआय एनडीएचा मित्रपक्ष आहे. मात्र, एनसीपीआयमध्ये प्रवेश केल्यानंतर ते त्यांच्या मतदारसंघात प्रवेश करू शकत नाहीत. अल्पसंख्याक मतदार ६० ते ६५ टक्के आहेत आणि त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, अशी टीका कल्याण बॅनर्जी यांनी केली. एनसीपीआय भाजपाची बी-टीम असल्याची टीका कुणाल घोष यांनी केली. तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सौगत रॉय यांनी तर, काही बंडखोर खासदार त्यांच्या संपर्कात असून ममता बॅनर्जींच्या गटात परतण्याची इच्छा व्यक्त करत असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, मतदारसंघातील जनतेच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकारांना सहकार्य करू, अशी भूमिका या तीनही खासदारांनी घेतली आहे.