scorecardresearch

NCRB Report 2020 : दिल्ली ठरतीये ‘क्राइम कॅपिटल’, महिलांसाठी सर्वात असुरक्षित

देशाच्या राजधानी शहरात अन्य महानगरांच्या तुलनेत सर्वाधिक हिंसक आणि महिलांविरोधातील गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

NCRB Report 2020 : दिल्ली ठरतीये ‘क्राइम कॅपिटल’, महिलांसाठी सर्वात असुरक्षित
दिल्ली ठरतेय 'क्राईम कॅपिटल'

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाचा (National Crime Record Bureau) २०२० या वर्षासाठीचा हा अहवाल जाहीर झाला आहे. त्यानुसार, २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये करोनाच्या काळात महिलांविरोधातील नोंद झालेल्या गुन्ह्यांचं प्रमाण ८.३ टक्क्यांनी घटलं आहे. मात्र, असं असलं, तरी देशाच्या राजधानी शहरात अन्य महानगरांच्या तुलनेत सर्वाधिक हिंसक आणि महिलांविरोधातील गुन्ह्यांची नोंद झाली आहे. NCRB च्या आकडेवारीनुसार दिल्ली हे महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहर आहे.

२०२० मध्ये देशाच्या राजधानीत महिलांविरोधातील गुन्ह्यांची १० हजार ९३ पेक्षा जास्त प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. ही संख्या मुंबई, पुणे, गाझियाबाद, बेंगळुरू किंवा इंदूरमध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या संख्येच्या तुलनेत दुपट्टीपेक्षा जास्त होती. तर २०१८ मध्ये दिल्लीत महिलांविरोधातील गुन्ह्यांची १३ हजार ६४० प्रकरणं नोंदवण्यात आली होती आणि त्या पुढील वर्षी ही संख्या ३०० ने कमी झाली होती.
आकडेवारी असंही दर्शवते की बहुतेक प्रकरणांमधील गुन्हेगार हे पीडितांना (कुटुंब, शेजारी इ.) ओळखत होते.

दिल्लीत सायबर गुन्ह्यांचं प्रमाण कमी

गेल्या वर्षी ऑनलाईन चोरी, फसवणूक आणि लैंगिक छळासह सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये १६८ पेक्षा जास्त प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. दरम्यान, इतर महानगरांच्या तुलनेत दिल्लीत सायबर गुन्ह्यांचं प्रमाण कमी असल्याचं पोलिसांनी सांगितली आहे.

खरंतर दिल्लीमध्ये भारतीय दंड संहितेअंतर्गत (IPC) नोंदवलेल्या प्रकरणांची संख्या २०१९ ते २०२० या एका वर्षात १८ टक्क्यांनी कमी झाल्याचं NCRB ने जारी केलेल्या आकडेवारीत समोर आलं आहे. गेल्या वर्षी दिल्ली पोलिसांनी २.४ लाखांहून अधिक म्हणजेच दिवसाला ६५० पेक्षा जास्त प्रकरणं नोंदवली होती. तर दुसरीकडे बंगळुरूमध्ये गुन्ह्यांची १९ हजार ९६४ आणि मुंबईत ५० हजार प्रकरणं नोंदवली गेली. तर २०२० मध्ये खुनाचे एकूण ४७२ गुन्हे नोंदविण्यात आले. यामागे प्रेम प्रकरण आणि मालमत्तेचा वाद हे सर्वात सामान्य हेतू होते. तर २०१९ मध्ये खुनाची ५२१ प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत.

दिल्लीत अपहरणाचे सर्वाधिक गुन्हे

एनसीआरबीची आकडेवारी असं दर्शवते की, अपहरणाची प्रकरणं २०१९ मध्ये ५ हजार ९०० वरून २०२० मध्ये ४ हजार ६२ झाली आहेत. त्यापैकी ३ हजारांपेक्षा जास्त प्रकरणात १२ ते १८ वयोगटातील पीडित होते. मात्र, आकडेवारीत घसरण होऊनही दिल्लीत अपहरणाचे सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेले आहेत. दिल्ली पाठोपाठ मुंबईत १ हजार १७३ आणि लखनौमध्ये ७३५ प्रकरणांची नोंद झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या