परदेशातील एचएसबीसी बँकेत खाते असलेल्या भारतीयांची संख्या तब्बल ११९५ असून या खातेधारकांच्या खात्यांमध्ये तब्बल २५ हजार ४२० कोटी रुपये शिल्लक असल्याची माहिती ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केल्यानंतर देशभर खळबळ उडाली आहे. परदेशातील पैशाबाबत माहिती मिळत नसल्याचे कारण पुढे करून केंद्र सरकार त्याबाबत चालढकल करीत होते. आता खातेधारकांची नवी यादी मिळाली असल्यामुळे परदेशी बॅंकांतील पैशाबाबत कारवाईसाठी केंद्र सरकारवर दबाव वाढला आहे. या स्विसलीक्सची केंद्राने गंभीर दखल घेतली असून, या नव्या यादीची चौकशी करण्यासाठी काळ्या पैशासाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) व्याप्ती वाढविण्यात येईल.  तसेच ज्या जागल्याने (व्हीसलब्लोअर) ही यादी मिळवून ती जाहीर केली, त्याच्या संपर्कात आम्ही आहोत, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.
स्विसलीक्सच्या या माहितीत नवी नावे आली आहेत. विशेष म्हणजे २०११ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांच्याकडील भारतीय खातेधारकांची यादी भारताला सुपूर्द केली होती. त्यात फक्त ६२८ जणांचीच नावे आहेत. या पाश्र्वभूमीवर खातेधारकांची संख्या ११९५ म्हणजे दुप्पट झाल्याचे दिसून येते. खातेधारकांमध्ये काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नारायण राणे कुटुंबीय, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांचीही नावे असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
परदेशातील बँकांमध्ये पसा ठेवणारे भारतीय किती आहेत, हे शोधण्यासाठी ‘एक्स्प्रेस’ने तीन महिन्यांची मोहीम राबविली. यासाठी वॉिशग्टनस्थित ‘इंटरनॅशनल कॉन्सॉर्टयिम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट’ (आयसीआयजे) आणि पॅरिसस्थित ‘ला माँड’ या दैनिकाची मदत घेतली. या यादीमध्ये देशातील नामांकित उद्योगपती, हिरेव्यापारी, राजकारणी आणि अनिवासी भारतीय यांचा समावेश आहे. देशातील मोठय़ा उद्योगपतींची एचएसबीसीमध्ये खाती आहेत. त्यामध्ये मुकेश अंबानी, अनिल अंबानी, आनंदचंद बर्मन, राजन नंदा, यशोवर्धन बिर्ला, चंद्रू लच्छमदास रहेजा, दत्तराज साळगावकर, भद्रश्याम कोठारी आणि श्रावण गुप्ता यांचा समावेश आहे. राज्याचे माजी उद्योगमंत्री आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या कुटुंबीयांचीही नावेही या यादीमध्ये आहेत. राणे यांची पत्नी नीलम राणे आणि मुलगा नीलेश राणे यांचा यामध्ये समावेश आहे. त्याबरोबरच सून स्मिता ठाकरे आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत वसंत साठे यांच्या कुटुंबीयांची नावेही यादीमध्ये आहेत. केंद्रातील गेल्या यूपीए सरकारमधील मंत्री प्रणीत कौर आणि काँग्रेसचे माजी खासदार अन्नू टंडन यांचेही नाव यादीमध्ये असल्याचे आढळले. दरम्यान, मुकेश आणि अनिल अंबानी, नरेश गोयल तसेच  नारायण राणे यांनी बेकायदा खाती असल्याचा इन्कार केला आहे. विशेष म्हणजे राजकारणाशी संबंधित खातेधारकांची संख्या कमी असल्याचे दिसून आले.
देशातील मोठय़ा हिरेव्यापाऱ्यांची नावेही या यादीमध्ये आहेत. त्यापकी बरेच जण परदेशांमध्ये स्थायिक झाले आहेत. एचएसबीसीमध्ये खात्यांवर यापकी अनेकांचे पत्ते मुंबईतील आहेत. त्यामध्ये रसेल मेहता, अनुप मेहता, सौनक पारिख, चेतन मेहता, गोिवदभाई काकडिया आणि कुणाल शहा यांचा समावेश आहे. स्वराज पॉल, मनू छाब्रिया यांचे कुटुंबीय, राजेंद्र रुईया आणि विमल रुईया आणि नरेशकुमार गोयल या प्रमुख अनिवासी भारतीयांची नावेही या यादीमध्ये आहेत. एचएसबीसीकडे असलेल्या भारतीय खातेधारकांपकी २७६ खातेधारकांच्या खात्यांमध्ये दहा लाख डॉलरची माया आहे. यापकी ८५ खातेदार हे देशात राहात असल्याचेही आढळले आहे.
दरम्यान, काळ्या पैशाबाबत माहितीची देवाण-घेवाण व्हावी याबाबत स्वित्र्झलड सरकारला प्रस्ताव दिला आहे, असे जेटली यांनी सांगितले. विशेष तपास पथकाचीही सोमवारी बैठक घेण्यात आली. या तपास पथकाची व्याप्ती वाढविण्यात येईल, असे पथकाचे उपाध्यक्ष अरिजित पसायत यांनी सांगितले.

मुकेश अंबानींच्या  कंपन्यांचे ३७२६ कोटी?
एक्स्प्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली: स्विसलिक्समधून एचएसबीसी बॅंकेच्या खातेदारांच्या जाहीर झालेल्या माहितीत सुमारे ३७२६ कोटींची रक्कम रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ११ कंपन्यांच्या नावे आढळली आहे. ही ११ खाती नेमकी कोणाची हे स्पष्ट होत नसले तरी या कंपन्यांच्या खात्यांचा संबंध रिलायन्सशी दिसून येतो. याबाबत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवक्त्याने सांगितले की, मुकेश अंबानी किंवा रिलायन्स इंडस्ट्रीजची कोणतीही बेकायदा परदेशी खाती नाहीत. 
खातेधारकांची नावे..
नरेश कुमार गोयल – जेट एअरवेजचे संस्थापक अध्यक्ष नरेश गोयल यांनी २००३ साली एचएसबीसीमध्ये तीन खाती उघडल्याची नोंद आहे. या खात्यांमध्ये २००६-०७ या आíथक वर्षांत ११६ कोटी इतकी रक्कम जमा होती. या संदर्भात स्पष्टीकरण देताना गोयल यांच्या प्रवक्त्यांकडून नरेश गोयल हे अनिवासी भारतीय असल्यामुळे जगभरात कुठेही अशा प्रकारचे बँक खाते उघडू शकत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
बर्मन कुटुंबीय – २००६-०७ च्या नोंदींनुसार, डाबर समूहाचे मालक असणाऱ्या बर्मन कुटुंबीयांच्या नावे एचएसबीसीमध्ये अनेक खाती असल्याचे समजते. यासंबंधी स्पष्टीकरण देताना आनंद बर्मन यांनी, मी १९९९ पासून अनिवासी भारतीय असल्याचे सांगितले.
दत्तराज वासुदेव साळगावकर, दीप्ती साळगावकर – व्ही. एम. साळगावकर समूहाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून दत्तराज साळगावकर यांची ओळख आहे. वासुदेव साळगावकर हे मुकेश आणि अनिल अंबानी यांची बहीण दीप्ती यांच्याशी विवाहबद्ध झाले होते.  साळगावकर कुटुंबातील चारही जणांची एचएसबीसीमध्ये खाती असल्याचे समजते. दत्तराज साळगावकर यांच्या एचएसबीसी बँकेच्या खात्यात शून्य रक्कम जमा असली तरी त्यांच्या पत्नी दीप्ती साळगावकर यांच्या नावे एचएसबीसीच्या खात्यात ५१.७ लाख डॉलर्स जमा आहेत. याशिवाय, त्यांची मुले विक्रम आणि ईशिता यांच्याही नावे एचएसबीसीची खाती आहेत.
अनुराग दालमिया – अनुराग दालमिया हे दालमिया ब्रदर्सचे उपाध्यक्ष आहेत. या समूहाच्या गुजरात हेवी केमिकल्स लिमिटेड (जीएचसीएल) आणि गोल्डन टोबॅको कंपनी (जीटीसी) प्रसिद्ध आहेत. अनुराग दालमिया यांनी २००० मध्ये एचएसबीसीमध्ये बँक खाते उघडले असून, २००६-०७ साली या खात्यामध्ये ५९.६ कोटींची रक्कम जमा असल्याची नोंद आहे.
मनु छाब्रिया आणि कुटुंबीय – छाब्रिया कुटुंबातील अनेक जणांनी २००२ मध्ये एचएसबीसी जीनिव्हा येथे बँक खाती उघडल्याची नोंद आहे.
अनु टंडन – काँग्रेसच्या माजी खासदार अनु टंडन यापूर्वी रिलायन्स समूहासाठी एक इलेक्ट्रॉनिक फर्म चालवत होत्या. भारतीय महसुली सेवेतील कर्मचारी असलेले संदीप टंडन यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांनी २००५ साली एचएसबीसी बँकेत दोन खाती उघडल्याची कागदपत्रे  असून, यामध्ये ३५.८ कोटी इतकी रक्कम जमा असल्याची नोंद आहे.
माहितीसाठी सरकारची पैसे देण्याची तयारी?
रितू सरीन, एक्स्प्रेस वृत्तसेवा : परदेशी बॅंकेतील खात्यांची माहिती देणाऱ्या जागल्यास (व्हीसलब्लोअर) पैसे देऊ केल्याची माहिती उघड झाली आहे. एचएसबीसी बॅंकेचे माजी कर्मचारी हर्व फाल्सिअनी यांची दीड महिन्यापूर्वी वित्त मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी फ्रान्समध्ये भेट घेतली होती. त्यावेळी भारतीय खातेधारकांची माहिती मिळवण्यासाठी त्यांना पैसे देऊ केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. या खात्यामधील पैशांवरील कर किंवा खात्यावरील रकमेचे १० टक्के रक्कम देण्याचे ठरविण्यात आले होते. यावर दोन्ही बाजूने चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. हा सौदा ठरविण्यापूर्वी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने अर्थमंत्री अरुण जेटली यांची मंजुरी घेतली होती. तसेच याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही माहिती होती, असे सूत्रांनी सांगितले.

खात्यांची माहिती फुटल्याची कबुली
दरम्यान, बँक खात्यांची माहिती बाहेर गेल्याचे एचएसबीसीने मान्य केले असून, आमच्या काही कमकुवत यंत्रणेचा हा दोष आहे, असे बँकेने म्हटले आहे. याबाबतच्या सर्व चौकशी यंत्रणांना आम्ही सहकार्य करणार असून, यंत्रणेतील दोष दूर करण्यासाठी कडक पावले उचलणार असल्याचे एचएसबीसीने स्पष्ट केले आहे.

नवीन यादी चोरीच्या माहितीवर आधारित
स्विस बँकेतील खात्यांबाबत एचएसबीसीची नवीन यादी ही चोरीच्या माहितीवर आधारित असल्याचे स्विस सरकारने म्हटले आहे. त्यामुळे त्यात पुरावे मिळवणे अवघड जाणार आहे. स्वित्र्झलडने म्हटले आहे, की काही वर्षांपूर्वी धोरणात बदल केल्यामुळे आम्ही काळ्या पैशाच्या विरोधात कारवाई करू. स्वित्र्झलड सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले, की २००७ किंवा त्याआधीच्या चोरलेल्या माहितीवर आधारित ही यादी आहे

मुकेश अंबानी – मुकेश अंबानी यांनी २००१ साली एचएसबीसी बँकेत दोन खाती उघडली होती. २००७-०८ या आíथक वर्षांत दोन्ही खात्यांतील एकूण रक्कम २.६६ कोटी इतकी होती.

स्मिता ठाकरे – बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता जयदेव ठाकरे यांनी २००२मध्ये मुंबईतून एचएसबीसी बँकेत खाते उघडले होते. त्यांच्या खात्यामध्ये ६४ लाख रु. जमा होते. याबाबत त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

नीलम राणे, निलेश राणे – माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम आणि पुत्र निलेश यांच्या एचएसबीसी खातेधारकांमध्ये समावेश आहे. मात्र, रकमेचा अधिकृत आकडा समजू शकलेला नाही.

अनिल अंबानी –अनिल अंबानी यांच्या एचएसबीसी बँकेच्या खात्यात १६४.९२ कोटी रुपये जमा असल्याचे समजते. मध्यंतरी ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ या संस्थेने एचएसबीसी जिनिव्हा येथे अंबांनीचे खाते असल्याचा आरोप केला होता.